01 March 2021

News Flash

शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन नव्हतेच!

शहा म्हणाले, जनादेशाचा अनादर करत सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेने तीन चाकी सरकार निर्माण केले आहे.

खासदार नारायण राणे यांच्या लाइफ टाइम मेडिकल कॉलेजचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले.

 

गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य; सत्तेच्या हव्यासातूनच विचाराला तिलांजली दिल्याचा आरोप

सावंतवाडी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतेही आश्वासन दिले नव्हते, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे.  भाजप-शिवसेना युतीला जनादेश दिला असताना शिवसेनेने तो नाकारत तीन चाकी सरकार निर्माण केले. मी बंद खोलीत नाही, तर जाहीररीत्या शब्द देतो असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेला फटकारले. शिवसेनेच्या मार्गाने आम्ही चाललो असतो तर शिवसेनाच शिल्लक राहिली नसती, असेही ते म्हणाले. खासदार नारायण राणे यांच्या लाइफ टाइम मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ओरस पडवे येथे बोलत होते.

बंद दाराआड मी कोणतीही आश्वासने देत नाही. जे काही करतो ते खुलेपणाने. आम्ही जे आश्वासन देतो त्याचे पालन करतो, असे शहा यांनी नमूद करताना, बिहारमधील उदाहरण दिले. बिहारमध्ये भाजपला जास्त जागा मिळूनदेखील नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपद दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही मते मागितली होती, असे शहा यांनी सांगितले.

शहा म्हणाले, जनादेशाचा अनादर करत सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेने तीन चाकी सरकार निर्माण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर उद्धव ठाकरे यांनी मते मागितली आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसेनेला त्यांनी तिलांजली दिली आहे. या तीन चाकी सरकारची तीन दिशांना तोंडे आहेत, अशी टीका त्यांनी केली.

शिवसेनेवर टीका करताना शहा म्हणाले, आम्ही तुमच्या रस्त्यावर चालणार नाही, तुमच्या मार्गाने चाललो असतो तर सेना उरलीच नसती. आम्ही जनकल्याण, अंत्योदय, राष्ट्रभक्ती या मार्गाने चालणारे आहोत. महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकत्र्यांना सरकारने घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी कार्यकर्ते घाबरणार नाहीत.

या मेडिकल कॉलेजचा फायदा सिंधुदुर्गसह कोकणातील विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे कोकणातला तरुण कोकणातच डॉक्टर होईल. गेल्या काही वर्षांत देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली आहेत.  त्यामुळे मेडिकल कॉलेजला प्रवेश घेणाऱ्या कोणत्याही विद्याथ्र्याला  प्रवेशापासून वंचित राहावे लागणार नाही. वैद्यकीय पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारने आर्थिक तरतूद केली आहे, असे त्यांनी सांगितले. या वेळी  गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,माजी गृहमंत्री कृपाशंकर सिंह उपस्थित होते.

शिवसेनेचे प्रत्युत्तर

शहा यांच्या वक्तव्यावर शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. दीड वर्षांनंतर शहा यांनी स्पष्टकरण देणे संशयास्पद आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात अनेक वेळा वक्तव्ये केली, तरीही शहा यांनी प्रतिक्रिया दिली नाही. निकालानंतर ते हरियाणात सरकार स्थापनेच्या घडामोडीत व्यस्त होते. महाराष्ट्रातील घडामोडींकडे दुर्लक्ष केले. ठाकरे कुटुंब हे वचन पाळणारे म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे, असेही त्यांनी नमूद केले.

नारायण राणे यांच्यावर अन्याय करणार नाही!

खासदार नारायण राणे यांचे कर्तृत्व अन्यायाच्या विरोधात निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवासात कायम कष्ट पडत राहिले आहेत. परंतु आम्ही त्यांच्यावर अन्याय करणार नाही, तर त्यांचा निश्चितच सन्मान करू आणि कसा सन्मान करायचा याचा निर्णय पक्ष घेईल, असे अमित शहा या वेळी म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2021 1:48 am

Web Title: shiv sena was not assured of the chief minister post akp 94
Next Stories
1 इंधन करकपात विचाराधीन!
2 सार्वजनिक उपक्रमांचा सहभाग मर्यादितच -अर्थमंत्री
3 इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने
Just Now!
X