संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. हा प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दाखल करुन घेतला असून त्यावर २० जुलै रोजी सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. मात्र, एनडीएतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने कायमच सरकारविरोधात भुमिका घेतल्याने या अविश्वास प्रस्तावाला शिवसेना पाठींबा देते की सरकारला हे उद्या स्पष्ट होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.


शिवसेना मोदी सरकारमधील एक प्रमुख सहकारी पक्ष आहे. मात्र, आपल्याला कायमच डावलण्यात येत असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. राज्यातही भाजपासोबत सत्तेत सहभागी असताना शिवसेनेने नेहमीच सरकारच्या धोरणांना विरोध केला आहे. त्यामुळे ते सत्तेत असूनही विरोधकांची भुमिका बजावत आहेत. त्याचबरोबर शिवसेनेने वारंवार प्रसंगी सरकारमधून बाहेर पडण्याची भाषाही केली आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेत मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावला शिवसेना पाठींबा देते की विरोध करते हे पाहणे औत्सुक्याचे आहे. मात्र, यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी आपली भुमिका स्पष्ट करण्याची शक्यता असल्याचे एएनआयने म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आमच्याकडे अविश्वास प्रस्ताव आणण्याइतपत खासदारांची संख्या असल्याचे बुधवारी सांगितले. मात्र, यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हा अतिआत्मविश्वास असल्याचे सांगत त्याचा काहीही फायदा होणार नाही, आम्ही २० जुलै रोजी लोकसभेत पूर्ण बहुमत सिद्ध करुन विरोधकांना आमची ताकद दाखवून देऊन असे म्हटले आहे.

काँग्रेसने अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळातही असाच उद्दामपणा दाखवला होता. त्यानंतर त्यांना तोंडावर पडायला झाले होते. भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांचा नेता म्हणून निवडून दिले असून त्यांच्यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही या अविश्वास प्रस्तवाला समोरे जायला तयार आहोत, असे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.