सरकारकडून अनेकदा वचने दिली जातात, मात्र ती पाळली जातात का? हे शोधण्यासाठी शिवसेना सत्यशोधक अभियान सुरु करणार आहे अशी घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दिली. सत्तेत राहूनही शिवसेना सरकारवर अंकुश ठेवू शकते हे आपण दाखवून दिले आहे येत्या काळात निवडणुका कधीही लागू शकतात त्याची तयारी ठेवा आणि सरकारने दिलेली आश्वासने पाळली जात आहेत की नाही याची शहानिशा करण्यास सुरुवात करा असा आदेशच उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना दिला.

एखाद्या गावात बॅनर लावलेला असतो त्यावर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचा फोटो असतो. लोकांना वाटते योजना खरीच असेल, आपल्या गावात नाही तर शेजारच्या गावात झाली असेल. शेजारच्या गावातल्या लोकांना वाटते आपल्या गावात आली नाही आपल्या शेजारच्या गावात आली असेल मात्र खरे काय आहे? हे कळतच नाही ते कळण्यासाठी सत्यशोधक अभियान सुरु करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या संपर्क फॉर समर्थन विरोधात शिवसेनेचे सत्यशोधक अभियान असणार आहे हेही त्यांनी जाहीर केले.

आपल्या भाषणात आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सगळ्याच शिवसैनिकांना निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर पीडीपी आणि भाजपाच्या घटस्फोटावरही त्यांनी टीका केली. पीडीपीशी भाजपाने अभद्र युती का केली? केल्यावर ती तोडण्यासाठी इतका वेळ का घेतला असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला. आज सकाळपासूनच मुंबईतील गोरेगाव या ठिकाणी शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. आज सकाळीच युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला. आदित्य ठाकरेंप्रमाणेच उद्धव ठाकरे यांनीही स्वबळाचा नारा दिला. कोणत्याही परिस्थितीत विधानसभेवर भगवा फडकवणारच अशी गर्जनाच आज उद्धव ठाकरेंनी दिली.