वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नारायण राणे यांच्याशी सामना असल्याने, मतदानाची गणिते कशी आखली जातील, याचा नेमका अंदाज घेऊन प्रतिस्पध्र्याचे डाव हाणून पाडणारा गनिमी कावा या मतदारसंघात सेनेचे शिलेदार आमदार अनिल परब यांनी अमलात आणला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होऊनही सेनेच्या हक्काच्या मतांची गणिते नेमकी जुळली आणि विजय सोपा झाला. अनिल परब यांच्या या करामतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, मी सामान्य शिवसैनिक असून आपल्यावर टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली यातच मी समाधानी आहे, अशा मोजक्या शब्दांत अनिल परब आपल्या आखणीचे गमक सांगून मोकळे होतात.
या मतदारसंघात गेल्या वेळी शिवसेना, भाजप, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम आदी पक्षांचे उमेदवार असल्याने मतविभागणी अटळ होती, तरीही शिवसेनेचे बाळा सावंत यांनी भाजपचे कृष्णा पारकर यांचा सुमारे १६ हजार मतांनी पराभव केला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तर चौथ्या व पाचव्या क्रमांकावर फेकले गेले होते. या पोटनिवडणुकीतील स्पर्धा बहुरंगी नसल्याने मतविभागणी होणार नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे शिवसेनेची हक्काची मते पारडय़ात पडलीच पाहिजेत, असे ठरवून बूथनिहाय आखणी करण्यात आली. संबंधित बूथप्रमुखावर ४०० मतांची जबाबदारी सोपविण्यात आली. प्रत्येक वसाहत, प्रत्येक बूथच्या क्षेत्रातील प्रत्येक घराशी संपर्क आणि स्थानिक समस्यांबाबत मतदारांशी संवाद असे सूत्र वापरून व दिवंगत बाळा सावंत यांच्या मतदारसंपर्काचा नेमका फायदा उठवत अनिल परब यांनी तृप्ती सावंत यांच्या विजयाचा मार्ग सोपा केला. जेव्हा अन्य पक्षांचे नेते जाहीर सभा आणि पदयात्रा काढत होते, तेव्हा आमचा शिवसैनिक घराघरात मतदारांशी संवाद साधत होता. शिवाय राणे यांच्यासारखा उमेदवार रिंगणात असल्याने पैशाचा पाऊस पडणार, याचाही आम्हाला अंदाज होता. त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचायचे, असा निर्धार करून आम्ही संपर्क मोहीम आखली, आणि ती यशस्वी झाली, असे परब म्हणाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना धोका दिल्यावर मातोश्रीच्या अंगणातच राणे यांना विजय मिळणार नाही हे तर स्पष्टच होते, तरीही शिवसेना संपली असे म्हणणाऱ्या राणे यांना शिवसेना समजलीच नाही, असा टोला परब यांनी मारला. राणे यांच्यामुळे शिवसैनिकांनी प्राण पणाला लावून निवडणूक लढविली आणि राणे यांना त्यांची जागा दाखवून दिली, असे ते म्हणाले. हा विजय म्हणजे शिवसैनिकांच्या संघटित प्रयत्नांचा विजय आहे, असेही त्यांनी नम्रपणाने नमूद केले.