मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १४७ (बोरला घाटला व्हिलेज) मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला. या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अनिल पाटणकर हे तब्बल ६,६२७ मताधिक्याने विजयी झाले.
काँग्रेसमध्ये घुसमट होत असल्यामुळे नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन अनिल पाटणकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यामुळे बोरला घाटला व्हिलेजमध्ये रविवारी पोटनिवडणूक घेण्यात आली. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर तात्काळ या प्रभागातून अनिल पाटणकर यांनाच उमेदवारी देण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे दुखावलेले शाखाप्रमुख नागेश तवटे यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
सोमवारी झालेल्या मतमोजणीमध्ये अनिल पाटणकर यांना ११,५१७ मते पडून ते तब्बल ६,६२७ मताधिक्याने विजयी झाले. काँग्रेस उमेदवार राजेंद्र नगराळे यांना ४,८९०, तर नागेश तवटे यांना ४,३१७ मते मिळाली.