राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा आणखीनच वाढत चालला आहे. त्यामुळे भाजपाकडून घोडेबाजार केला जाण्याची भीती शिवसेनेला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहून आमदारांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे.

मिलिंद नार्वेकर पत्रात म्हणतात, शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आणि शिवसेनेचे सहयोगी उपक्ष आमदार हे वांद्र्यातील रंगशारदा हॉटेलमधून आज संध्याकाळी ७ वाजता मालाडमधील रिट्रीट हॉटेल येथे नेण्यात येणार असून त्या ठिकाणी ते १५ नोव्हेंबरपर्यंत असतील. त्यामुळे ८ ते १५ नोव्हेंबरपर्यंत त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी.

हॉटेल रिट्रीट येथे शिवसेनेचे आमदार आणि सहयोगी अपक्ष आमदारांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वारंवार भेटीगाठी घेऊन चर्चा करणार आहेत. त्यासाठी त्यांना एकत्र ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी याठिकाणी संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योग्य ती सुरक्षा व्यवस्था आणि काळजी घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती नार्वेकर यांनी पत्रातून केली आहे.