News Flash

अटीतटीच्या लढतीत शिवसेना की काँग्रेस ?

भाजपशी युती झाल्याने शिवसेना उमेदवाराला हायसे वाटत असतानाच, गेल्या वेळच्या पराभवाचे उट्टे काढण्याचा देवरा यांचा प्रयत्न आहे.

अटीतटीच्या लढतीत शिवसेना की काँग्रेस ?
(संग्रहित छायाचित्र)

प्रसाद रावकर

कुलाबा, नरिमन पॉइंट ते थेट वरळी, शिवडीपर्यंत विस्तारलेल्या दक्षिण मुंबईत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मिलिंद देवरा यांच्यात पुन्हा लढत होणार आहे. भाजपशी युती झाल्याने शिवसेना उमेदवाराला हायसे वाटत असतानाच, गेल्या वेळच्या पराभवाचे उट्टे काढण्याचा देवरा यांचा प्रयत्न आहे. मराठी, गुजराती-मारवाडी-जैन मतदारांवर शिवसेनेची भिस्त असून यंदा आव्हान सोपे नसल्याने शिवसेनेला निकराची लढाई करावी लागेल, अशीच चिन्हे आहेत.

दक्षिण मुंबई हा एकेकाळचा अस्सल मराठमोळा परिसर. उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि गिरणगावातील कष्टकरी अशा संमिश्र वस्त्या. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये विविध कारणांमुळे मराठी कुटुंबांनी पश्चिम आणि पूर्व उपनगरांची वाट धरली आणि हळूहळू दक्षिण मुंबईमधील मराठी टक्का कमालीचा घसरला. गुजरात, राजस्थान आणि अन्य राज्यांतील नागरिक व्यवसायाच्या शोधात मुंबईत दाखल झाले आणि त्यापैकी बहुतांश नागरिकांनी दक्षिण मुंबईत आपले बस्तान बसविले आणि हा भाग बहुभाषीक बनला. त्यामुळे या परिसरातील समिकरणे बदलून गेली.

घसरलेला मराठी टक्का, अमराठी नागरिकांची वाढलेली संख्या, शिवसैनिकांमधील अंतर्गत वाद, व्यावसायिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन पक्षकार्य करणारे कार्यकर्ते यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये या भागात शिवसेनेची पडझड होऊ लागली आहे. कुलाबा ते ताडदेव दरम्यानचा चिराबाजार, गिरगाव, कुंभारवाडा, खेतवाडय़ा, ग्रॅन्टरोड, ताडदेव आदी परिसर शिवसेनेची बलस्थाने. पण हे बालेकिल्लेही े खालसा होत गेले.

दक्षिण मुंबईतील आपले काही बालेकिल्ले अभेद्य असल्याचा शिवसेनेचा समज दोन वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दूर झाला. मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि भाजपमधील युती संपुष्टात आली आणि त्याचे पडसाद दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उमटले. गुढीपाडव्याचे निमित्त साधून काढण्यात आलेल्या नववर्षांच्या यात्रांवरुन स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आणि शिवसेनेमध्ये निर्माण झालेला वाद विकोपाला गेला. त्याचा परिणाम पालिका निवडणुकीत या भागात पाहायला मिळाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने घराघरात पोहोचून केलेला प्रचार शिवसेनेला झटका देऊन गेला. पालिका निवडणुकीत कुलाबा ते ताडदेव दरम्यानच्या नऊपैकी सात प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी शिवसेनेला धुळ चारली.

सेनेचे नगरसेवक जास्त

कुलाब्यापासून शिवडीपर्यंत  ३६ नगरसेवक असून त्यात शिवसेनेचे १८, भाजप १०, काँग्रेस ६, अखिल भारतीय सेना एक आणि समाजवादी पार्टी एक असे बलाबल आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांचे संख्याबळ अधिक असले तरी या मतदारसंघातील घसरलेला

मराठी टक्का ही चिंतेची बाब आहे . यामुळेच युतीत हा मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी भाजपच्या स्थानिक नेत्यांची मागणी होती. मराठी, गुजराती, मारवाडी, जैन मतदारांचे समीकरण जुळल्यास विजय मिळविणे शक्य होईल, असे शिवसेनेचे गणित आहे. काँग्रेसमध्ये मिलिंद देवरा हे उच्चंभ्रू, गुजराती-मारवाडी-जैन, अल्पसंख्याक आणि काही प्रमाणात मराठी मतांच्या जोरावर आशावादी आहेत. २००४ ते २०१४ असे दहा वर्षे देवरा यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. देवरा व त्यांचे वडिल माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांनी भाडेकरू व विविध प्रश्नांच्या संदर्भात केलेल्या कामांचा लाभ होईल, असा मिलिंद यांना विश्वास आहे. पण पराभवानंतर देवरा गेले पाच वर्षे कुठे होते, असा सवाल शिवसेनेकडून केला जात आहे.

समस्या तशाच

दक्षिण मुंबईमधील रहिवाशांना मुबलक, सुरळीत आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने मलबार हिल ते क्रॉस मैदान दरम्यान जलबोगदा उभारला. पण आजही दक्षिण मुंबईमधील काही भागांमध्ये दुषित आणि अपुऱ्या पाणीपुरवठय़ाचा प्रश्न कायम आहे. कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठय़ामुळे रहिवाशांमध्ये रामप्रहरी होणारे वाद थांबलेले नाहीत. या परिसरात मोठय़ा संख्येने दाटीवाटीने उभ्या असलेल्या बहुसंख्य चाळी मोडकळीस आल्या आहेत. काही चाळींनी पुनर्विकासाची वाट धरली आणि चाळी जमीनदोस्त झाल्या. मात्र काही अडचणींमुळे पुनर्विकासाचे प्रकल्प रखडले आणि रहिवाशीही बेघर झाले आहेत. दोन चाळींमधील कचऱ्याने भरलेल्या निमुळत्या घरगल्ला, कमकुवत बनलेल्या मलनि:स्सारणाच्या जाळ्यामुळे निर्माण होणारी अस्वच्छता अशा अनेकविध समस्यांनी या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. दक्षिण मुंबईमध्ये सध्या सुरू असलेल्या ‘मेट्रे-३’ प्रकल्पाच्या कामांमुळे होणारी वाहतूक कोंडी, पुनर्विकास प्रकल्प आणि मेट्रोच्या कामांमुळे सतत उडणारी धुळ रहिवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. मात्र या समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे फारसे लक्षच नाही.

लोकसभेच्या मागील निवडणुकीत परिस्थिती निराळी होती. आता परिस्थिती बदलली आहे. देशातील चित्रही बदलत आहे. शिवसेना – भाजपची युती झाली आहे. लोकसभेतील उपस्थिती, चर्चेतील सहभाग अशा सगळ्याच स्तरांवर आपल्याला आघाडीचे स्थान मिळाले आहे. गेल्या पाच वर्षांत केलेले कामची पोचपावती मतदार मतांच्या रुपात देतील.

-अरविंद सावंत, खासदार

गेल्या पाच वर्षांत मुंबईची प्रचंड अधोगती झाली आहे. गेल्या पाच वर्षांत केंद्र आणि राज्यात शिवसेना-भाजपने सत्ता उपभोगली. मुंबईच्या विकास आराखडय़ावरही काही विशेष काम केले नाही. शिवसेनेने तर केवळ मोदी सरकारवर टीका करण्याचे काम करीत वेळ वाया घालवला. या संधीसाधू युतीने मराठी माणसांची फसवणूक केली आहे. जनतेची फसवणूक करणाऱ्या या सरकारला आता घरी पाठवण्याची वेळ आली आहे.

– मिलिंद देवरा, काँग्रेस

विधानसभेचे चित्र

वरळी               शिवसेना

शिवडी              शिवसेना

भायखळा         एमआयएम

मलबार हिल     भाजप

मुंबादेवी           काँग्रेस

कुलाबा             भाजप

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2019 1:42 am

Web Title: shiv senas congress in the contest
Next Stories
1 विखे पुत्राला पक्षात थांबविण्याचे प्रयत्न
2 ‘माढाच नाही, महाराष्ट्रही जिंकू! राष्ट्रवादीच्या विजयाचा पेढा घरपोच मिळेल’
3 ‘पुलवामासारखा हल्ला पुन्हा होऊ शकतो’ या राज ठाकरेंच्या वक्तव्याविरोधात तक्रार
Just Now!
X