पक्षातील संभाव्य बंडाळी थोपविण्यासाठी समस्त शिवसैनिकांना शिवबंधनात अडकविण्याचे सामूहिक अभियान राबवून काही दिवस होत नाहीत तोच, सेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील सैनिकांमधील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आले आहेत.
येथील दादोजी कोंडदेव स्टेडिअमच्या प्रवेशद्वारास दिवंगत क्रिकेटपटू आणि ज्येष्ठ शिवसेना नगरसेवक सहदेव ढमाले यांचे नाव देण्याच्या ठरावाची गेली आठ वर्षे अंमलबजावणी न झाल्याने निराश झालेले त्यांचे पुत्र माजी नगरसेवक विलास ढमाले यांनी आयुक्तांना पत्र लिहून तो ठरावच रद्द करण्याची विनंती केली आहे.
शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत क्रिकेटपटू सहदेव ढमाले १९६७ ते १९९२ याकाळात नगरसेवक म्हणून कार्यरत होते. ज.के. फाइल्स कंपनीच्या क्रिकेट संघाचे कर्णधार असणाऱ्या ढमाले यांनी दादोजी कोंडदेव स्टेडियमची खेळपट्टी तयार करण्यासाठी विशेष्मेहनत घेतली होती. त्यामुळे स्टेडिअमच्या प्रवेशद्वारास त्यांचे नाव देण्याचा ठराव ८ डिसेंबर २००६ च्या महासभेस संमत करण्यात आला. मात्र महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही गेली आठ वर्षे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. वरिष्ठांसमोर स्पष्ट व परखड बोलण्यामुळे मला होणारा राजकीय त्रास मी गृहीत धरला आहे, पण दिवंगत वडिलांचा अपमान करून त्यांचा असा अपमान करणे योग्य नाही, असेही विलास ढमाले यांनी पत्रात नमूद केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 26, 2014 3:35 am