News Flash

शिवसेनेचा असहकार व पवारांबद्दलच्या सहानुभूतीचा फटका!

भाजपच्या पराभूत उमेदवारांकडून कारणमीमांसा

(संग्रहित छायाचित्र)

निवडणुकीच्या काळात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा असहकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूतीचा निवडणुकीत फटका बसल्याचा सूर भाजपच्या पराभूत उमेदवारांनी पक्षाच्या बैठकीत लावला. पवारांच्या पावसातील सभेचा माध्यमे व समाजमाध्यमांतून झालेल्या प्रचारामुळे शेवटच्या दोन दिवसांत वातावरण आणखी विरोधात गेल्याची बाबही अनेक पराभूत उमेदवारांनी नमूद केली.

राज्यातील राजकीय परिस्थिती व संघटनात्मक कामांसाठी भाजपने गुरुवारपासून तीन दिवस बैठका घेतल्या. शनिवारी शेवटच्या दिवशी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप व सहयोगी पक्षांच्या उमेदवारांची बैठक घेण्यात आली.

भाजपने मित्र पक्षांसह १६४ जागा लढवल्या आणि १०५ जागांवर विजय मिळवला. पराभूत झालेल्या ५९ उमेदवारांना या बैठकीस बोलावण्यात आले होते. भाजप सरकारने केलेल्या कामांबाबत जागरूकता निर्माण करण्यात कमी पडल्याची तक्रारही काही उमेदवारांनी केली.

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मतदारसंघात बंडखोरी होती तेथे शिवसैनिकांनी थेट बंडखोर शिवसैनिकांचे काम केले. मात्र बंडखोरी नसलेल्या ठिकाणीही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी भाजप उमेदवारांना सहकार्य केले नाही. अनेक पदाधिकारी दाखवण्यापुरते प्रचारात सहभागी व्हायचे. पण आपापल्या भागात जाऊन मतदारसंपर्क व भाजपसाठी मतदान करण्यास सांगणे शिवसेना नेत्यांनी टाळले, असे अनेक पराभूत उमेदवारांनी सांगितले.

त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकटय़ाने प्रचाराची खिंड लढवल्याने त्यांच्याबाबत सहानुभूती निर्माण झाली. शिवाय साताऱ्यात पवारांनी पावसात भिजत केलेले प्रचाराचे भाषण शेवटच्या दोन दिवसांत मतदारांमध्ये परिणामकारक ठरल्याचे अनेक आमदारांनी बैठकीत सांगितले.

चिंतित आमदार आणि लग्नाची गोष्ट..

गेल्या तीन दिवसांत भाजपचे आमदार, पदाधिकारी व पराभूत उमेदवारांच्या बैठका झाल्या.निवडणूकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतरही सत्ता कायम राखण्यात अपयश आल्याने आणि आता राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना यांच्या सत्तास्थापनेच्या हालचाली वेगवान झाल्याचे परिणाम भाजप नेत्यांवर पाहायला मिळाले. सत्ता जाण्याची चिंता माजी मंत्री, आमदारांमध्ये दिसत होती. एकमेकांना भेटल्यावर त्याबाबतच चर्चा सुरू व्हायची. भाजपचेच सरकार येणार असे नेते सांगत असले तरी सोक्षमोक्ष लागेपर्यंत काही खरे नाही, असाच सूर या नेत्यांच्या बोलण्यातून निघत होता. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने आपल्या गावरान ढंगात त्यावर भाष्य केले. गावात एक अनाथ मुलगा आपल्या आजीबरोबर राहत होता. वयात आला तरी त्याच्या लग्नाबाबत आजी हालचाल करत नव्हती. अखेर वैतागून तुला माझे लग्न लावायचे नसेल तर निदान लग्नाच्या गोष्टी तरी कर, अशी विनवणी त्या नातवाने केली. आमदार होऊनही शपथविधी न झाल्याने आणि विरोधकांचे सरकार येण्याच्या शक्यतेमुळे चिंतित असलेल्या आमदारांची अवस्था या नातवासारखी आहे. म्हणूनच नेतेमंडळी सारख्या सरकार स्थापनेच्या गोष्टी करत असल्याचा टोला या नेत्याने गप्पांचा फड रंगवताना लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 12:57 am

Web Title: shiv senas non cooperation and pawars sympathy blow abn 97
Next Stories
1 पीएमसी बँक घोटाळा, माजी भाजपा आमदाराच्या मुलाला अटक
2 विषारी इंजेक्शन घेऊन केईएम रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या
3 मुंबईत भाजपाचं राहुल गांधींविरोधात आंदोलन
Just Now!
X