सलग चार दिवसांच्या प्रयत्नानंतर राणीबागेतील शिवा गेंडय़ाला त्याच्यासाठी आणलेल्या पिंजऱ्यात पाठवण्यात उद्यान अधिकाऱ्यांना यश आले. रविवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास शिवा गेंडा दिल्लीला रवाना झाला.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील एकशिंगी गेंडा शिवा याला नवी दिल्ली येथील प्राणीसंग्रहालयात पाठवण्याचा निर्णय झाल्यावर बुधवारी, १४ ऑगस्ट रोजी नऊ वाजता त्याला रवाना करण्याची वेळ ठरली. पाच वर्षांपूर्वीही शिवाला मुंबईबाहेर पाठवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तो दुसऱ्या पिंजऱ्यात जाण्यास तयार नव्हता. हा अनुभव असल्याने आठवडाभर आधीपासूनच त्याच्या पिंजऱ्याच्या दरवाजाला लागून दुसरा पिंजरा लावण्यात आला.
त्याचे जेवण दुसऱ्या पिंजऱ्यात ठेवून त्याला तिथे जाण्यास भाग पाडण्यात आले. मात्र तरीही दिल्लीहून आणलेल्या पिंजऱ्यात जाण्यास तो तयार नव्हता. गेंडा हा प्राणी स्वतच्या मस्तीत राहणारा असल्याने उद्यान कर्मचारीही त्याला चुचकारून पिंजऱ्यात जाण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर पाचव्या दिवशी, रविवारी भूक लागल्याने सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शिवा पिंजऱ्यात गेला.
तो जेवत असतानाच पिंजऱ्याचे दार लावून घेण्यात आले. त्याला पिंजऱ्याची थोडी सवय व्हावी, तो शांत -स्थिर व्हावा यासाठी काही काळ जाऊ देण्यात आला. त्यानंतर क्रेनच्या मदतीने शिवाचा पिंजरा ट्रकवर चढवण्यात आला. दुपारी साडेचार वाजता शिवाची स्वारी दिल्लीकडे रवाना झाली. ‘शिवा गेंडय़ाला त्रास होऊ नये यासाठी गाडीचा वेग कमी ठेवण्यात येणार आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत शिवा दिल्ली येथील राष्ट्रीय प्राणी उद्यानात पोहोचेल,’ अशी अपेक्षा उद्यान अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.