महापालिकेच्या क्षयरोग रुग्णालयातील डॉक्टरला एक्सडीआर टीबी झाल्याचे निष्पन्न झाल्याने कर्मचाऱ्यांना होत असलेल्या या आजाराच्या संसर्गाचा मुद्दा पुन्हा पुढे आला आहे. अनेकवेळा विनंती करूनही डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना केली गेली नसल्याने कर्मचारी संघटना आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
क्षयरोग रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर, नर्ससह ४५ कर्मचाऱ्यांना क्षयरोग झाला आहे. त्यातील २७ जणांना अनेक औषधांना दाद न देणारा एमडीआर टीबी झाल्याचेही निष्पन्न झाले आहे. अनेक कर्मचारी खाजगी रुग्णालयातून उपचार घेत असल्याने त्यांची माहिती पालिकेकडून दिली जात नाही. आता एका डॉक्टरला एक्सडीआर (बहुतांश औषधांना दाद न देणारा) क्षयरोग झाल्याने उघडकीला आले आहे. हा क्षयरोगाचा सर्वात घातक प्रकार असून त्यावरील हमखास उपचारपद्धती उपलब्ध नाही. त्यामुळे कर्मचारी धास्तावले आहेत.
रुग्णांवर उपचार करताना सतत संपर्कात आल्याने कर्मचाऱ्यांना आजार होण्याची शक्यता वाढते. शिवडी येथील महापालिकेच्या क्षयरोग रुग्णालयातील कर्मचारी या आजाराच्या विळख्यात सापडत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. संपर्क होऊ नये यासाठी तोंडावर लावायचे एन९५ मास्क, ग्लोव्हज तसेच सकस आहार पालिकेकडून पुरवला जाणे आवश्यक असते. मात्र याबाबत प्रशासनाकडून हलगर्जीपणा केला जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. अनेकदा अर्जविनंत्या करूनही प्रशासनाकडून अक्षम्य हेळसांड होत असून याबाबत कर्मचारी आता आंदोलन करतील, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष सुनील चिटणीस यांनी दिला.