अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या आधी मुंबईत स्मारकाची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण मुंबईत ही प्रतिकृती उभारण्यात येणार असून याची उंची २५ फूट असणार आहे. प्रतिकृतीच्या सहाय्याने तज्ञ, सामान्य मुंबईकर आणि विशेष म्हणजे पर्यकांकडून त्यांची मतं आणि सल्ले जाणून घेण्यात येणार आहेत.

समुद्रात उभारण्यात येणाऱ्या स्मारकासाठी राज्य सरकारने एल अॅण्ड टी कंपनीकडे स्मारकाच्या बांधकामाची जबाबदारी सोपवली आहे. हे स्मारक तीन वर्षांत पूर्ण करण्यात येणार असून या स्मारकासाठी राजभवनापासून १.२ किलोमीटर आणि गिरगाव चौपाटीपासून ३.६ किलोमीटर तर नरिमन पॉंइंट पासून २.६ किलोमीटर अंतरावर असलेली जागा निश्चित करण्यात आली आहे. वर्षाच्या सुरुवातीला काम सुरु होईल अशी अपेक्षा आहे.

‘फक्त तज्ञ आणि मुंबईकरच नाही तर आम्ही पर्यटकांकडूनही सल्ले घेणार आहोत. प्रतिकृती उभारण्यासाठी अद्याप जागेची निवड झालेली नसून त्याचा शोध सुरु आहे. फाऊंटन, काळा घोडा, गेटवे ऑफ इंडिया किंवा नरीमन पॉईंट यापैकी एका जागेची निवड करण्यात येईल. या ठिकाणी पर्यटकांची तसंच मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते’, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

छत्रपतींच्या स्मारकात महाराजांची उंची घटली, तलवारीची वाढली

‘यामुळे आम्हाला तज्ञांकडून वेगवेगळ्या बाबतीत सल्ले तसंच विरोध असल्यास त्यासंबंधी माहिती मिळण्यास मदत होईल. विशेष म्हणजे सर्वसामान्यही आपली मतं नोंदवू शकतात. योग्य आणि चांगले सल्ले विचारात घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल. उच्चस्तरीय समिती प्रतिकृती उभारण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा विचार करत आहे’, असंही त्यांनी सांगितलं आहे.

शिवस्मारकाची घाई कोणासाठी?

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारने आराखड्यात काही बदल केले असून पुतळ्याची उंची कमी केली आहे. महाराजांच्या पुतळ्याची उंची ७.५ मीटरने कमी करण्यात येणार आहे. दरम्यान पुतळ्याची उंची कमी करण्यात येणार असल्याने तलवारीची उंची प्रस्तावित आराखड्यापेक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरुन एकूण उंची कमी होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २४ डिसेंबर २०१६ रोजी स्मारकाचे भुमीपूजन करण्यात आले होते.

शिवस्मारक जगातील सर्वाच उंच स्मारक असेल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

राज्य सरकारच्या प्रस्तावित आराखड्यानुसार पुतळ्याची उंची एकूण १२१.२ मीटर होती. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची उंची ८३.२ मीटर आणि तलवारीची उंची ३८ मीटर होती.

मात्र यावर्षी राज्य सरकारने बांधकाम खर्चात कपात कऱण्यासाठी पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुतळ्याची उंची ८३.२ ऐवजी कमी करुन ७५.७ मीटर करण्यात येणार असून तलवारीची उंची ३८ मीटर ऐवजी ४५.५ मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुतळ्याची एकूण उंची कमी होणार नसून १२१.२ मीटरच राहणार आहे. स्मारकाची एकूण उंची २१० मीटर असणार आहे.

यामुळे तांबे, स्टील आणि इतर गोष्टींचा कमी वापर होईल. या बदलामुळे बांधकाम खर्च ३३८.९४ कोटींनी कमी झाला आहे. राज्य सरकारने एल अॅण्ड टी कंपनीला स्मारकाच्या बांधकामाची जबाबदारी सोपवल्यानंतर विरोधकांनी टीका करत पुतळ्याची उंची कमी करत चौथऱ्याची उंची वाढविण्यात आल्याचा आरोप केला होता. राज्य सरकारने मात्र आरोप फेटाळून लावत पुतळ्याची उंची १२१.२ मीटरच राहिल असं सांगितलं होतं.

या प्रकल्पाच्या कंत्राटासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी लार्सन अँड टूब्रो कंपनीची निविदा अंतिम पात्र ठरली. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि लार्सन अँड टूब्रो कंपनीशी सविस्तर चर्चा करून तसंच कायदेतज्ज्ञांचा सल्ला विचारात घेऊन वाटाघाटीअंती अडीच हजार कोटी रुपये अधिक वस्तू आणि सेवा कर असा प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनी विधिमंडळात एका निवेदनाद्वारे दिली होती.