अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अखेर मुहूर्त मिळाला असून एप्रिल किंवा मे महिन्यात भूमिपूजन करण्याबाबत तयारी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. स्मारक उभारणीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सुकाणू समितीने मान्यता दिली आहे.
स्मारकासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून निविदा प्रक्रियेबाबतही त्यांनी माहिती घेतली. या बैठकीस अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे, अतिरिक्त मुख्य सचिव पी एस मीना, सुमित मलिक, प्रवीण परदेशी, नितीन करीर, सुनील पोरवाल आदी उपस्थित होते.