छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी १५.९६ हेक्टर जागा निश्चित करण्यात आली आहे. ही जागा राजभवनापासून १.२ किलोमीटर अंतरावर, गिरगाव एच२ओ जेटीपासून ३.६ किलोमीटर अंतरावर आणि नरिमन पाईंटपासून २.६ किलोमीटर अंतरावर आहे. या स्मारकासाठी १०० कोटी रूपये टोकन तरतूद करण्याचा निर्णय बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
स्मारकाच्या जागेवर अन्वेषण व सर्वेक्षण करणारी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, निरी, मेरीटाईम बोर्ड व आयआयटी पवई यांनी या पूर्वीच आपले काम सुरू केले आहे. अरबी समुद्रातील स्मारकासाठी यापूर्वीच १५.९६ हेक्टर जागा निश्चित करण्यात आली असून, या स्मारकाचे आराखडे तयार करणे, पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी घेणे, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासही मान्यता देण्यात आली आहे.