25 October 2020

News Flash

छत्रपतींच्या स्मारकात महाराजांची उंची घटली, तलवारीची वाढली

बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारने आराखड्यात काही बदल केले असून पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारने आराखड्यात काही बदल केले असून पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराजांच्या पुतळ्याची उंची ७.५ मीटरने कमी करण्यात येणार आहे. दरम्यान पुतळ्याची उंची कमी करण्यात येणार असल्याने तलवारीची उंची प्रस्तावित आराखड्यापेक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरुन एकूण उंची कमी होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २४ डिसेंबर २०१६ रोजी स्मारकाचे भुमीपूजन करण्यात आले होते.

इंडियन एक्स्पेसने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मिळवलेल्या कागदपत्रांनुसार, राज्य सरकारच्या प्रस्तावित आराखड्यानुसार पुतळ्याची उंची एकूण १२१.२ मीटर होती. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची उंची ८३.२ मीटर आणि तलवारीची उंची ३८ मीटर होती.

मात्र यावर्षी राज्य सरकारने बांधकाम खर्चात कपात कऱण्यासाठी पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुतळ्याची उंची ८३.२ ऐवजी कमी करुन ७५.७ मीटर करण्यात येणार असून तलवारीची उंची ३८ मीटर ऐवजी ४५.५ मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुतळ्याची एकूण उंची कमी होणार नसून १२१.२ मीटरच राहणार आहे. स्मारकाची एकूण उंची २१० मीटर असणार आहे.

यामुळे तांबे, स्टील आणि इतर गोष्टींचा कमी वापर होईल. या बदलामुळे बांधकाम खर्च ३३८.९४ कोटींनी कमी झाला आहे. राज्य सरकारने एल अॅण्ड टी कंपनीला स्मारकाच्या बांधकामाची जबाबदारी सोपवल्यानंतर विरोधकांनी टीका करत पुतळ्याची उंची कमी करत चौथऱ्याची उंची वाढविण्यात आल्याचा आरोप केला होता. राज्य सरकारने मात्र आरोप फेटाळून लावत पुतळ्याची उंची १२१.२ मीटरच राहिल असं सांगितलं होतं.

या प्रकल्पाच्या कंत्राटासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी लार्सन अँड टूब्रो कंपनीची निविदा अंतिम पात्र ठरली. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि लार्सन अँड टूब्रो कंपनीशी सविस्तर चर्चा करून तसंच कायदेतज्ज्ञांचा सल्ला विचारात घेऊन वाटाघाटीअंती अडीच हजार कोटी रुपये अधिक वस्तू आणि सेवा कर असा प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनी विधिमंडळात एका निवेदनाद्वारे दिली होती.

हे स्मारक तीन वर्षांत पूर्ण करण्यात येणार असून या स्मारकासाठी राजभवनापासून १.२ किलोमीटर आणि गिरगाव चौपाटीपासून ३.६ किलोमीटर तर नरिमन पॉंइंट पासून २.६ किलोमीटर अंतरावर असलेली जागा निश्चित करण्यात आली आहे .

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 9:53 am

Web Title: shivaji memorial sculpture shorter sword taller to bring down cost of construction
Next Stories
1 ‘प्रत्येक बेपत्ता मुलगी प्रियकरासोबत पळून गेलेली नसते’, उच्च न्यायालयाने फटकारलं
2 मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प
3 विजय मल्ल्या भाजपाचे नवे ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ – उद्धव ठाकरे
Just Now!
X