शिवस्मारकाच्या उंचीवरुन करण्यात आलेलं राजकारण दुर्देवी असल्याचं सांगताना शिवस्मारक जगातील सर्वाच उंच स्मारक असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. शिवस्मारकाच्या सर्व परवानग्या मिळाल्या असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिलं. छत्रपती राजाराम महाराज यांच्या विचारांवर आधारित पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारने आराखड्यात काही बदल केले असून पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराजांच्या पुतळ्याची उंची ७.५ मीटरने कमी करण्यात येणार आहे. दरम्यान पुतळ्याची उंची कमी करण्यात येणार असल्याने तलवारीची उंची प्रस्तावित आराखड्यापेक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरुन एकूण उंची कमी होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २४ डिसेंबर २०१६ रोजी स्मारकाचे भुमीपूजन करण्यात आले होते.

 

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उंचीचा वाद विधानसभेत उफाळून आला होता. शेजारच्या गुजरात राज्यात उभ्या राहणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची सर्वात जास्त राहावी म्हणून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची सरकारने ३४ मीटरने कमी केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता.