|| प्रसाद रावकर

मैदानावर हिरवा गालिचा निर्माण करण्याचे स्वप्न लांबणीवर

मुंबई : शिवाजी पार्क मैदानातून सतत उडणाऱ्या धुळीपासून रहिवाशी, पादचाऱ्यांची मुक्तता करण्यासाठी पालिकेने तेथे गवताचा गालिचा निर्माण करण्याचा प्रकल्प आखला. मात्र शिवाजी पार्कमधील एक लाख चौरस मीटर क्षेत्रातील गवताला आवश्यक असलेले प्रतिदिन २ लाख ६४ हजार लिटर पाणी उपलब्ध होत नसल्याने हा प्रकल्प बारगळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानाच्या सभोवतालचे रहिवासी आणि या परिसरातून जाणाऱ्या रहिवाशांना भविष्यातही धुळीचा त्रास सहन करावाच लागणार आहे.

शिवाजी पार्क मैदानामध्ये क्रिकेटचे सामने, फुटबॉलचा सराव केला जातो. तसेच दादर आणि आसपासच्या परिसरातील मुले या मैदानावर खेळण्यासाठी येत असतात. सकाळी आणि संध्याकाळी मैदानात फेरफटका मारण्यासाठी अनेक जण येत असतात. तसेच मोठय़ा संख्येने पर्यटकही शिवाजी पार्कला भेट देत असतात. यामुळे मैदानातून सतत धूळ उडत असते. या धुळीचा आसपासच्या रहिवाशांना प्रचंड त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे मैदानात पाण्याची फवारणी करून उडणाऱ्या धुळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने रहिवाशांकडून करण्यात येत आहे. रहिवाशांची मागणी लक्षात घेत पालिकेने मैदानामध्ये गवताचा हिरवा गालिचा निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले. मैदानातील तब्बल एक लाख चौरस मीटर क्षेत्रावर गवताचा गालिचा निर्माण करण्याचेही पालिकेने निश्चित केले. मात्र या गवतासाठी दररोज २ लाख ६४ हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे. केवळ एका मैदानासाठी प्रतिदिन २ लाख ६४ हजार लिटर पाणी पालिकेकडे उपलब्ध नाही. मैदानातील दोन विहिरींतून प्रतिदिनी ५० हजार लिटर पाणी उपलब्ध होऊ शकेल. मात्र मैदानातील प्रस्तावित गवतासाठी ते पुरेसे नाही, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

वर्षां संचयन प्रकल्प राबवून पाणी उपलब्ध होण्यासाठी किमान दोन वर्ष प्रतीक्षा करावी लागेल. त्यामुळे मैदानातच सांडपाणी पुनप्र्रक्रिया केंद्र उभारण्याचा विचार पालिका पातळीवर सुरू आहे. दादर परिसरातील सांडपाणी मैदानातील सांडपाणी पुनप्र्रक्रिया केंद्रात आणून शुद्धीकरणानंतर त्याचा वापर मैदानातील गवतासाठी करण्याची योजना पुढे आली आहे. मात्र ही योजना राबवायची की नाही याबाबत अद्याप निश्चिती होऊ शकलेली नाही. पाण्याअभावी गालिचा प्रकल्पाला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे रहिवाशांना भविष्यातही धुळीचा त्रास सहन करावाच लागणार आहे.

शिवाजी पार्क मैदानातील दोन विहिरींमधील पाणी आटू लागले आहे.  प्रतिदिन ५० हजार लिटर पाणी या विहिरींतून उपलब्ध होऊ शकेल. मात्र संपूर्ण मैदानातील गवताच्या गालिचासाठी २ लाख ६४ हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मैदानात छोटेखानी सांडपाणी पुनप्र्रक्रिया केंद्र उभारून पाणी उपलब्ध करता येऊ शकेल. अन्य स्रोतांतून पाणी कसे उपलब्ध करता येईल याचा अभ्यास करण्यात येत आहे. – किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, ‘जी-उत्तर’ विभाग.