१५ दिवसांत ५ साप आढळल्याने स्थानिकांत भीतीचे वातावरण

मुंबई : शिवाजी पार्क मैदानात गेल्या काही दिवसांपासून सापांचा सुळसुळाट सुरू झाला असून गेल्या १५ दिवसांत पाच साप या ठिकाणी पकडण्यात आले आहेत. शुक्रवारी दुपारी या ठिकाणी एक धामण पकडण्यात आली. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून खेळाडूंसाठी बंद असलेल्या शिवाजी पार्क मैदानात आता खेळण्यासाठी मुले जमू लागली असून गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी साप आढळल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. आतापर्यंत कधीही या मैदानात साप दिसल्याच्या तक्रारी नव्हत्या. मात्र यंदा साप दिसू लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, टाळेबंदीमुळे शिवाजी पार्कचे मैदान काही महिने बंद होते त्यामुळे या काळात मैदानात लोकांचा वावर नसल्यामुळे तसेच इंदू मिलचे काम सुरू झाल्यामुळे तेथील जमिनीत असलेले साप बाहेर येत असावेत अशी शक्यता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मैदानात गवत वाढल्यामुळेही येथे साप आश्रयाला येत असावेत.  गेल्या १५ दिवसांत या ठिकाणी कोब्रा, धामण असे विविध प्रकारचे साप आढळून आले आहेत.  त्यापैकी एक साप विषारी होते तर बाकीचे बिनविषारी होते. लोकांनी सर्पमित्रांना बोलावून हे साप पकडून दिले आहेत.

शुक्रवारी दुपारी विराज उक्शेकर यांनी धामण जातीचा साप पकडला. मेट्रोच्या कामांसाठी जमीन खणण्याचे काम सुरू असल्यामुळे साप सुरक्षित जागा शोधत असून मैदानात उंदीर असल्यामुळे उंदरांना पकडण्यासाठी हे साप येत असल्याची शक्यता विराज यांनी व्यक्त केली आहे. या मैदानात दरवर्षी पावसाळ्यात गवत वाढते, पण पावसाळ्यानंतर पालिकेतर्फे गवत कापून टाकले जाते. या वर्षीही पहिल्यांदा साप आढळला तेव्हाच सगळे गवत कापून टाकल्याची माहिती साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.