घाटकोपर येथील बोगस ‘कॉल सेंटर’ उद्ध्वस्त

मुंबई : खासगी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतलेल्या व्यक्तींना तडजोडीच्या नावाखाली फसवणूक करणारे कॉल सेंटर शिवाजी पार्क पोलिसांनी उद्ध्वस्त केले. या कॉल सेंटरचा प्रमुख २० वर्षांचा तरुण असून त्याने अशा प्रकारे अनेक कर्जदारांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे.

शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तक्रारदारावर बजाज फायनान्स आणि इंडियाबुल्सचे एकू ण दोन लाख रुपयांचे कर्ज होते. काही दिवसांपूर्वी बजाज फायनान्स कंपनीचा अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीने त्याच्याशी संपर्क साधला. कंपनीने कर्ज तडजोडीसाठी एक योजना सुरू केली आहे. त्यात ठरावीक रक्कम अदा केल्यास उर्वरित कर्ज माफ केले जाईल, असे सांगितले. तक्रारदाराने लागलीच या व्यक्तीला इंडियाबुल्सच्या कर्जाबाबतही सांगितले. दोन्ही कंपन्यांचे कर्ज माफ होण्यासाठी ४० हजार रुपये एकरकमी भरावे लागतील, असे सांगितले. तक्रारदाराने लागलीच ४० हजार रुपये या व्यक्तीला दिले. मात्र काही दिवसांनी इंडियाबुल्स कंपनीतून तक्रारदाराशी संपर्क साधून उर्वरित कर्जाबाबत विचारणा करण्यात आली, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले.

या प्रकरणाची नोंद शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करून घाटकोपर येथील कैलास एक्सप्लनेड संकुलातील ‘कॉल सेंटर’वर छापा घातला. तेथे सात तरुण शहरातील विविध संस्थांकडून कर्ज घेतलेल्या व्यक्तींना संपर्क साधून तडजोडीच्या निमित्ताने जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या चौकशीतून सोमनाथ दास या २० वर्षांच्या तरुणाचे नाव पुढे आले. त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे विविध वित्त संस्थांकडून कर्ज घेतलेल्या व्यक्तींचे नेमके तपशील आढळले. तसेच बनावट कागदपत्रांआधारे विकत घेतलेली दीडशे सिम कार्डही जप्त करण्यात आली. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सोमनाथने अनेक व्यक्तींकडून रोख रक्कम आणि ऑनलाइन स्वरूपात तडजोडीच्या निमित्ताने पैसे स्वीकारले आहेत, अशी माहिती  पुढे आली आहे.