ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी. सावळाराम कला समिती यांच्या संयुक्त विद्यामाने दिला जाणारा जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे गायिका कृष्णा कल्ले-राय यांना गंगा-जमुना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये रविवारी सायंकाळी ४.३० वाजता पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.  जनकवी पी. सावळारामांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष असून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १४ वर्षांपासून संगीत, चित्रपट, साहित्य, नाटय़, कला व शिक्षण या क्षेत्रामध्ये अद्वितीय कामगिरी करणाऱ्या गुणीजनांना दरवर्षी सन्मानित करण्यात येते. यंदा ठाण्यातील तीन मान्यवर व्यक्तींनाही या कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामध्ये साहित्यिक क्षेत्रातील डॉ. र. म. शेजवलकर, शैक्षणिक क्षेत्रातील मंगला सिन्नरकर आणि उदयोन्मुख कलाकार डॉ. प्रमोद धोरे यांचा समावेश आहे. ११ हजार आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये संवाद निर्मित व प्रस्तुत जनकवी पी. सावळाराम यांच्या गीतावर दृक्श्राव्य ‘अक्षय गाणी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नरेंद्र बेडेकर सादरीकरण करणार आहेत तर सोमवारी रात्री ८.३० वाजता चौरंग निर्मित अशोक हांडे प्रस्तुत ‘जनकवी पी. सावळाराम’ यांच्या गीत लहरी-गंगा जमुना हा कार्यक्रम होणार आहे.