कोणाला काहीही व्हावयाचे तरी व्यक्तिमत्त्वाचे मूलद्रव्य महत्त्वाचे असते. आरोग्यसंपन्न अंगकाठी, प्रसन्न मुद्रा, सुस्पष्ट वाणी, सुसंगत विचार, स्थिर व अंगविक्षेपरहित विवेचनशैली या गोष्टी प्रभावी वक्तृत्वाला साह्यभूत ठरतात.. अक्षरब्रह्म प्रकाशनाच्या ‘कथा वक्तृत्वाची’- शिवाजीराव भोसले, या पुस्तकामधून  आजचे वक्तृत्व चरण.
वक्तृत्व या विषयाच्या संदर्भात एक प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. वक्तृत्व हे जन्मजात असतं की संपादित? ज्याला वक्ता व्हावे असे वाटते त्याने काय करावे? प्रयत्नान्ती त्याच्या पदरी काही पडेल काय? ज्याला बोलणे आवडते व मनोभावे बोलावे असे सतत वाटत राहते, तो एक झाकलेला वक्ता असतो. तो सभेत उशिरा प्रकट होईल, पण वक्ता म्हणून त्याचा जन्म झालेला असतो. बोलण्याची ओढ हा व्यक्तिस्वभाव आहे. तो जन्मजात आहे. पण बोलावे वाटणे आणि प्रभावी बोलता येणे, या दोन अवस्थांत अंतर आहे. बोलण्यासाठी काही निमित्त लागते. वक्ता, विषय, श्रोता आणि सभा यांच्यात समन्वय घडावा लागतो. जवळ बोलण्यासारखे काही असणे आवश्यक आहे हे खरे, पण ते नेमके काय? जे आपणच सांगितले पाहिजे व आपल्यासारखे जे अन्य कोणी सांगू शकणार नाही, अशी वक्त्याच्या अंतरमनाची खात्री पाहिजे.
वक्तृत्वसाधना ही अखंडित प्रक्रिया आहे. पाणी वाहता वाहता निवळत जाते तसे बोलण्याच्या बाबतीतही घडते. सुरुवातीच्या काळात लोकांना चकित करणाऱ्या  प्रासांचा मोह पडतो. टाळ्यांचा कल्लोळही आवडतो. पण खरा अभ्यासक या मोहाच्या पाशातून मुक्त होतो. त्याला अभ्यासानेच हे कळते, की महापुरुषांच्या जीवनात शब्दांची झगमग नसते. असते ते विचारांचे वैभव, अभ्यासामुळे प्राप्त होणारी विद्या आणि विद्येतून प्रकट होणारा विनय ही वक्तृत्वभूषणे काळाच्या ओघात वाटय़ाला येतात. आजकालच्या तथाकथित लोकप्रिय लोकनेत्यांना अभ्यासाची बैठक नसते. भावनावश अनुयायांच्या टाळ्या व फड जिंकल्याचा क्षणिक आनंद, ही त्यांच्या वक्तृत्वाची सरहद्द ठरते. त्यांचे अनुकरण करणारे त्यांचे अनुयायी या हद्दीतच घोटाळतात.
आधुनिक भारतात वक्तृत्वाविषयी काही जाणिवा प्रथम प्रकट झाल्या त्या आंग्लविद्याविभूषित अशा नवशिक्षितांच्या जीवनात. विद्यापीठात अभ्यासल्या जाणाऱ्या एडमंड बर्क व मेकॉले यांच्या भाषा सौष्ठवसंपन्न अशा विलोभनीय वक्तव्याचा प्रभाव नामदार गोखले, शास्त्री, रानडे यांच्यावर पडला. स्वामी विवेकानंदांच्या महाविद्यालयातील तत्कालीन प्राध्यापक व प्राचार्य हे विद्वान वक्ते होते. मद्रास, कलकत्ता, मुंबई ही  नवशिक्षितांची ठाणी, बौद्धिक दिग्गजांची वसतिस्थाने होती. त्यांच्या सहवास कक्षेत जे वाढले ते वक्ते म्हणून मोठय़ा इतमामाने उभे राहिले.  
मराठी वक्तृत्वाला दर्जा आणि उंची ज्यांच्यामुळे प्राप्त झाली ते सावरकर, पराजंपे, खापर्डे, माटे, फडके, नाथ पै, रावसाहेब व अच्युतराव पटवर्धन हे सर्व म्हणजे ओथंबलेल्या मनाने शब्दांचा वर्षांव करणारे विचारवेध होते. त्यांच्याजवळ सांगण्यासारखे बरेच काही होते. जे होते ते सांगण्याचा अट्टहास होता. ते सांगण्याची शैलीही होती. प्रसिद्धीच्या हव्यासातून त्यांनी वृथा खटपटी केल्या नाहीत. वक्तृत्व हे त्यांच्या साधनेचे फलित होते, प्राप्तव्य नव्हते. साहित्य, धर्म, देश, समाज हे त्यांचे चिंतनविषय होते. त्यांना स्पष्टता, सखोलता व सुभगता प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी अनेक ग्रंथांचा धांडोळा घेतला. आपल्या क्षेत्रातील समानधर्मी असे सहयोगी शोधले. त्यांच्याशी संवाद साधला. या प्रक्रियेतून विचारांची एक प्रणाली तयार झाली. संस्कृत, मराठी, हिंदूी व विशेषत: इंग्लिश भाषांतील महत्त्वाचे ग्रंथ अभ्यासल्यामुळे शब्दसमृद्धी वाटय़ाला आली. वक्ता, नेता, लेखक
, संशोधक या सर्वाना समान अशी एक साधना आहे. ती म्हणजे व्यक्तिमत्त्व संवर्धन होय. प्रसन्न, संपन्न, प्रगल्भ व्यक्तिमत्त्व हा जीवनाचा मानबिंदू आहे. कोणाला काहीही व्हावयाचे तरी व्यक्तिमत्त्वाचे मूलद्रव्य महत्त्वाचे असते. आरोग्यसंपन्न अंगकाठी, प्रसन्न मुद्रा, सुस्पष्ट वाणी, सुसंगत विचार, स्थिर व अंगविक्षेपरहित विवेचनशैली या गोष्टी प्रभावी वक्तृत्वाला साह्यभूत ठरतात. त्या सर्व संपादित व प्रयत्नसाध्य असतात. वक्त्याला आपले सामाजिक उद्दीपनमूल्य वेळीच कळले पाहिजे. लोकांचे आपल्याकडे लक्ष असते. बोलणे, चालणे, कपडेलत्ते, उच्चारण पद्धती या सर्व बाबी लोक नजरेने टिपत असतात. टिळक, गोखले, फुले, नेहरू, आंबेडकर, राधाकृष्णन, फडके, माटे ही सर्व मंडळी तशी रूपवेडी किंवा सौंदर्यासक्त नव्हती, पण तरीही त्यांच्या ठायी एक प्रकारचे नेटकेपण होते. त्याचाही लोकांवर प्रभाव पडत असे. साधेपणातही रुबाब असतो हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर सहज लक्षात येत असे. बर्क, मेकॉले, चर्चिल हे प्रथम श्रेणीचे इंग्लिश वक्ते, नामदार गोखले, श्रीनिवास शास्त्री हे त्याच तोलाचे भारतीय वक्ते. जगाला ते एकाच रूपात दिसले. त्यांचे व्यक्तिमत्त्व ही त्यांनीच निवडलेली रचना असे, आकृतिबंध असे. ती एक जडणघडण असे. प्रतिपाद्य विषयाचे ज्ञान आणि भाषाप्रभुत्व या व्यासंगप्राप्त गोष्टी होत. त्यात जन्मजात, निसर्गदत्त किंवा आनुवंशिक काही नसते. वक्तृत्वशैली हीसुद्धा तशी संपादित असते. ज्यांच्याविषयी आपल्या मनात आकर्षण व कौतुक असते, आदरभाव असतो, त्यांचे नकळत घडणारे अनुकरण हा आपल्या वक्तृत्वातील एक महत्त्वाचा घटक असतो. संस्कारशील वयात ज्यांनी अनेक उत्तम भाषणे ऐकली त्यांचे अबोध मन हे शब्द आणि कल्पना यांचे भांडार होते. केवळ श्रवणामुळे आपल्या अंतर्यामी एक वक्तृत्वपीठ निर्माण होते.इंग्लिश भाषेत एक लोकप्रिय सुभाषित आहे, ‘रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे’. रोम नगराची उभारणी एका दिवसात पुरी झाली नाही. दिवसामासांची बेरीज होत वर्षांमागून वर्षे गेली आणि मग ती रम्य रोम नगरी साकारली. ताजमहाल हीदेखील दीर्घकालीन कामगिरी आहे. वक्त्याचे व्यक्तिमत्त्व हे त्याच्या प्रयत्नातून, अभ्यासातून, प्रयोगातून घडत जाणारे लेणे असते.

नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाईस व भारतीय आयुर्विमा मंडळ यांच्या सहकार्याने आणि जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड व तन्वी हर्बल्स यांच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धा होत आहे.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…