लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : शहराला पूर्व-पश्चिम जोडणारा आणि वांद्रे-वरळी सागरी मार्ग, शिवडी-चिर्ले ट्रान्स हार्बर मार्ग या प्रकल्पांशी जोडणी असलेला वरळी-शिवडी उन्नत मार्ग प्रकल्प तीन वर्षांनंतर अखेरीस मार्गी लागला. नुकतेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या उन्नत मार्गाचे १२७४ कोटी रुपयांचे कंत्राट गेल्या महिन्यात जे. कु मार इन्फ्रो प्रोजेक्ट्सला दिले असून तीन वर्षांत म्हणजे २०२३ला पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

शहरातील पूर्व-पश्चिम वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उन्नत मार्ग २०१३ पासून प्रस्तावित आहे. या मार्गाची शिवडी-चिर्ले मुंबई ट्रान्स हार्बर मार्गाशी जोडणीदेखील यामध्ये आहे. मात्र दरम्यान ट्रान्स हार्बर प्रकल्पाची सुरुवातच प्रदीर्घ काळ लांबली, त्यामुळे उन्नत मार्गदेखील रखडला. शिवडी-वरळी उन्नत मार्गास प्राधिकरणाच्या २७  फेब्रुवारी २०१८ च्या बैठकीत परवानगी देण्यात आली, त्यानंतर पर्यावरणीय तसेच बंदर परवानग्या यामध्ये हा उन्नत मार्ग अडकला. अखेरीस गेल्या महिन्यात एमएमआरडीएने या प्रकल्पाचे कंत्राट जारी केले.

उन्नत मार्गाच्या दोन्ही बाजूंचा काही भाग सागरी हद्द नियंत्रण कायद्याअंतर्गत (सीआरझेड) येतो. त्यामुळे महाराष्ट्र सागरी किनारा विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाने किनाऱ्यावरील बांधकामाबाबत जनसुनावणी घेण्यास सांगितली. या वर्षी ७ जानेवारीला ही जनसुनावणी झाली. मात्र या बैठकीत सीआरझेडबाबत आक्षेप कमी आणि मार्गावरील रहिवाशांच्या विस्थापित होण्याच्या मुद्दय़ावरच अधिक आक्षेप आले.

उन्नत मार्गावर दोन ठिकाणी रेल्वे रूळ ओलांडावे लागणार आहेत. तसेच प्रभादेवी आणि परळ स्थानकाजवळ सध्याच्या मार्गावरून हा रस्ता प्रस्तावित आहे. त्यामुळे या ठिकाणी सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडप्रमाणे दुहेरी पूल असेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जानेवारीतील जनसुनावणी दरम्यान रहिवाशांच्या विस्थापनाचा मुद्दा पुढे आला होता. त्या वेळी हा उन्नत मार्ग बृहन्मुंबई प्रारूप विकास आराखडय़ानुसार बांधण्यात येत असून उन्नत मार्गाखालील रस्त्याचेही रुंदीकरण होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे उन्नत मार्गासाठी खासगी जागा ताब्यात घेण्याचा मुद्दा नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

उन्नत मार्ग आखणीच्या व्यवहार्यतेवरदेखील या वेळी आक्षेप मांडण्यात आले होते. परळ भागातील रुग्णवाहिकांची कोंडी कमी करण्यासाठी रचना यामध्ये नाही. या टप्प्यात उन्नत मार्गावरून उतरण्याची सोय यामध्ये असणार नसल्याचे त्या वेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

४.५१ किमीचा मार्ग

हा उन्नत मार्ग वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड या दोन महत्त्वाच्या मार्गाना जोडणार आहे. उन्नत मार्गामुळे शिवडी ते वरळी हे अंतर केवळ दहा मिनिटांत पार करता येईल.  शिवडी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडून उन्नत मार्गास सुरुवात होणार असून आचार्य दोंदे मार्ग, जगन्नाथ भातणकर मार्ग, ड्रेनेज चॅनेल रोड या मार्गावरून जात नारायण हर्डीकर मार्ग येथे समाप्त होईल. चार मार्गिका असणारा हा उन्नत मार्ग ४.५१ किमीचा आहे. शिवडी रेल्वे स्थानक, मुंबई पोर्ट ट्रस्ट मार्ग आणि प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानक येथे रेल्वे मार्गावर दुहेरी पूल असेल. त्यामुळे याची उंची २७ मीटर इतकी असेल.