पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी टीका करत पक्षातील अतिउत्साही कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना आवर घालण्याची विनंती आपण करणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच नरेंद्र मोदींना मराठी माणसांच्या भावना माहित असल्याने हे करायला त्यांनी सांगितलं असेल, असं मला वाटत नाही असंही ते म्हणाले आहेत. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असल्याने ते आपली तुलना महाराजांसोबत करणार नाहीत. त्यांचा नक्कीच या प्रकरणाशी संबंध नसेल अशी खात्री शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा – ‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ पुस्तकाचे भाजपा कार्यालयात प्रकाशन

“छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा नंतरच्या काळातील स्वातंत्र्य सेनानी यापैकी कोणाचीही तुलना कोणासोबत होऊ शकत नाही”, असेदेखील शिवेंद्रराजे म्हणाले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक वेगळी प्रतिमा आहे. त्यांनी स्वत: ती निर्माण केली आहे. नरेंद्र मोदी यांनी जगासमोर भारताची एक वेगळी प्रतिमा उभी करुन दाखवली आहे. त्यांनी देशवासियांचा विश्वास संपादीत केला आहे,” अशी स्तुती यावेळी त्यांनी केली.

आणखी वाचा – भाजपाने रायगडावर नाक घासून शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची माफी मागावी – धनंजय मुंडे

“पण पक्षात काही अतिउत्साही कार्यकर्ते, पदाधिकारी असतात. त्यांच्या माध्यमातून असे काही प्रकार होतात. आणि विरोधकांना पक्षनेतृत्त्वार टीका करण्यास, चिखलफेक करण्यास संधी मिळते. अशा पदाधिकाऱ्यांना आवर घातला पाहिजे. त्यांना योग्य ती समज दिली पाहिजे अशी विनंती मी पक्षश्रेष्ठींकडे करणार आहे,” असं शिवेंद्रराजे यांनी म्हटलं आहे. तसंच या पुस्तकाचं प्रकाशन थांबवावं आणि प्रकाशन झालं असेल तर वितरण थांबवावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली.