राज्यातील अवैध वाहतुकीला चाप, एसटीची प्रवासीसंख्या वाढवण्याचे आव्हान, कर्मचाऱ्यांना महागाईभत्त्याची थकबाकी, ‘शिवनेरी’ बसमध्ये महिलांसाठी १० राखीव आसने, सेमी लक्झरी बसेसमध्ये चांगली आसने अशा विविध घोषणांची जंत्री परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी केली. एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर साधलेल्या संवादात त्यांनी एसटीत सकारात्मक बदल घडवण्याची ग्वाही दिली.
एसटीची प्रवासी संख्या पूर्वीच्या ७० ते ८० लाख प्रतिदिन संख्येवरून ५५ लाख प्रतिदिन पोहोचली आहे. ही संख्या वाढवण्यासाठी चांगल्या बसेसच्या सुविधेप्रमाणेच अवैध वाहतुकीस रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे स्पष्ट केले.
एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात झालेल्या परिषदेत परिवहन विभागाचे अतिरिक्त सचिव गौतम चटर्जी, एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे आदी उपस्थित होते.
एसटीतील सर्व कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांची थकबाकी देण्याचीही घोषणा त्यांनी केली.
यापकी तीन महिन्यांची थकबाकी जुलपर्यंत, तर उर्वरित तीन महिन्यांची थकबाकी ऑगस्टमध्ये देणार असल्याचे स्पष्ट केले.
‘हिरकणी’मध्ये आधुनिक आसने
बेस्ट बसमधील एअरब्रेकसारखीच पद्धत यापुढे हिरकणी (सेमी लक्झरी) बसेसमध्ये बसवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांना चांगली आसने देण्याच्या दृष्टीने ‘पुशअप’ (मागेपुढे सरकणारी) आसने पुरवली जाणार आहेत.
स्वतंत्र निधी
राज्यातील रस्ते वाहतूक सुरक्षेसाठी स्वतंत्र निधी उभारला जात आहे. त्यात वाहतूक नियंत्रणासह विविध गोष्टींचा समावेश होणार आहे.
नव्या डिझाइनप्रमाणे गाडय़ा
एसटीमध्ये येत्या काळात नव्या पद्धतीच्या डिझाइननुसार गाडय़ा बनवल्या जाणार आहेत. त्याची प्रारूप आवृत्ती पूर्ण झाली झाली आहे.
‘शिवनेरी’त राखीव आसने
मुंबई-पुणे मार्गावरील लोकप्रिय ठरलेल्या ‘शिवनेरी’मध्ये यापुढे महिलांसाठी दहा आसने राखीव ठेवली जाणार आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाणार आहे. या आसनांवर महिला प्रवासी न आल्यास त्या अन्य प्रवाशांना दिल्या जातील, असेही त्यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘कुंभमेळ्या’साठी २२०० बसेस
नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी एसटीतर्फे २२०० बसेसचा ताफा पुरवण्यात येणार आहे. या कुंभमेळ्यात यात्रेकरूंच्या प्रवासासाठी एसटीचाच वापर केला जाणार आहे. त्यात खासगी गाडय़ांना प्रवेश दिला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याच काळात इतर तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी अतिरिक्त ७०० ते ८०० बसेसची सुविधा दिली जाईल.

ज्येष्ठांसाठी‘स्मार्ट कार्ड’
एसटी प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना तिकीट सवलतीसाठी आधार कार्ड दाखवण्याच्या नियमावरून बरेच वाद-प्रतिवाद निर्माण होत आहेत. त्याची दखल घेत परिवहनमंत्र्यांनी यापुढे हा गोंधळ संपवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्रांसाठी स्मार्ट कार्ड दिले जातील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivneri bus
First published on: 21-06-2015 at 12:01 IST