मुंबई आणि नागपूर या महाराष्ट्राच्या दोन टोकांना जोडणारी एसटीची वातानुकुलित व्होल्वो सेवा सुरू होऊन पाच दिवसच उलटले असले, तरी या सेवेच्या भरमसाठ तिकीट दरांमुळे प्रवासी जेरीस आले आहेत. ९०० किलोमीटरच्या या प्रवासासाठी एसटी सध्या २३७० रुपये तिकीट आकारत आहे. मात्र खासगी वाहतूकदार याच व्होल्वो सेवेसाठी फक्त १४०० रुपये घेत असल्याने प्रवासी एसटीकडे पाठ फिरवून खासगी बसने नागपूरला रवाना होत आहेत. विशेष म्हणजे पहिले पाचही दिवस गाडी नागपूर किंवा मुंबईला पोहोचण्यास किमान दोन तर कमाल पाच तास उशीर झाल्याने प्रवासी नाराज आहेत.
महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून राज्य परिवहन महामंडळाने मुंबई-नागपूर या दरम्यान वातानुकुलित व्होल्वो सेवा सुरू केली. अंदाजे ९०० किलोमीटरचा हा प्रवास व्होल्वोने १७ तासांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रवासासाठी एका वेळी २२५ लीटर म्हणजे सुमारे १५ हजार रुपये किमतीचे डिझेल लागते. तसेच दोन चालक व दोन वाहक यांचा खर्च पाच हजार रुपये इतका आहे. दुरुस्ती खर्च पाच हजार रुपये पकडला, तरी एका फेरीचा खर्च २५ हजार रुपये एवढा आहे.
सध्या एसटी या फेरीसाठी माणशी २३७० रुपये आकारत आहे. तर याच प्रवासासाठी खासगी वाहतूकदार १४०० रुपये भाडे घेतात. एसटीकडे येणारे प्रवासी हा तिकीट दर ऐकूनच खासगी वाहतूकदारांकडे वळतात. त्यामुळे पहिल्या दिवशी २८ हजार रुपये एवढा व्यवसाय झालेल्या एसटीला पुढील फेऱ्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. एसटीच्या फेसबुक पेजवरही प्रवाशांच्या तक्रारींचा प्रचंड खच पडत आहे. तिकीट दर ७००-८०० रुपयांनी कमी करावेत, पण तिकीट परवडत नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

प्रवाशांना आकृष्ट करण्याची गरज
 कोणतीही नवीन सेवा सुरू करताना तिकीट दरांमध्ये थोडी सवलत दिल्यास प्रवाशांना आकृष्ट करण्यात मदत होते. एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे तिकीट दरांमध्ये ३० टक्क्यांपर्यंत कपात करण्याचे अधिकार आहेत. मात्र याबाबत व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.