एस.टी. महामंडळाने मुंबई-पुणे मार्गावर सुरू केलेल्या ‘शिवनेरी’ बसच्या तिकिटात ८ जुलैपासून सरासरी ८० ते १०० रुपयांनी कपात करण्यात आली असून त्यानंतर आजतागायत ‘शिवनेरी’च्या प्रवाशी संख्येत प्रति फेरी तीन-चारप्रमाणे तब्बल ६० हजारांनी वाढ झाली आहे.

वाढलेले तिकीट दर आणि ओला-उबेरसारख्या टॅक्सी सेवेशी स्पर्धा यामुळे ‘शिवनेरी’च्या प्रवासी संख्येत प्रचंड घट झाली होती. एसटीच्या वाहतूक विभागाने ‘शिवनेरी’च्या तिकीट दरात कपात करण्याचा निर्णय घेत प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला एसटीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आणि ८ जुलैपासून ‘शिवनेरी’ची कमी दरातील सेवा मुंबई-पुण्याच्या विविध मार्गावर सुरू झाली. पहिल्या दिवसापासूनच शिवनेरीला चांगला प्रतिसाद मिळत गेला. मध्यंतरी पुणे-मुंबई मार्गावर रेल्वेच्या अनियमित फेऱ्यांमुळे ‘शिवनेरी’ला प्रतिसाद मिळाला.

सध्या ११८ बसेसच्या माध्यमातून सरासरी २७५ फेऱ्या या मार्गावर होत असून शनिवार, रविवार, सोमवारी त्यात वाढ करण्यात येते. दादर ते पुणे स्थानक या मार्गावर दर पंधरा मिनिटाला सकाळी ५ पासून रात्री ११ पर्यंत ‘शिवनेरी’ धावत असते. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, बोरिवली या भागांतील प्रवासी, तसेच पुण्यातील हिंजवडी, औंध, शिवाजी नगर, पिंपरी-चिंचवड, स्वारगेट या भागांतील प्रवासी ऑनलाइन तिकीट अथवा एसटीच्या मोबाइल अ‍ॅपद्वारे शिवनेरीचे तिकीट बुक करीत असल्याचे आढळून आले आहे.