शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना एकनिष्ठ राहण्याची शपथ दिली आणि त्यानंतर राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवबंधन प्रतिज्ञा दिनाचा कार्यक्रम घेऊन बाळासाहेबांनी त्यावेळी शिवसैनिकांना दिलेल्या शपथेची ध्वनिफित शिवसैनिकांना ऐकवली आणि त्यांच्याकडून पुढील काळातही पक्षासोबत एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली. बाळासाहेबांनी त्यावेळी शिवसैनिकांना दिलेली थपथ इथे देत आहोत…

बाळासाहेब म्हणतात… मी पहिल्यांदा आपल्याला एक शपथ देणार आहे. कारण ही कामं आता निष्ठेने झाली पाहिजेत. निष्ठा नाही अशातला प्रश्न नाही, पण त्यात आणखी कडवटपणा आपल्यामध्ये भिनला पाहिजे. त्याकरता मी एक शपथ देतोय. तुम्ही सगळ्यांनी हात वर करायचे आणि ज्यापध्दतीने मी वाचेन त्यापध्दतीने तुम्ही त्याचा उच्चार करायचा. सगळ्यांनी हात वर करायचे, आजूबाजूला बघायचं कुणी हात वर केला नाही, कुणी खिशात ठेवलाय की काय वगैरे.  पत्रकार सोडून आणि पोलिसांना सोडून. पण पोलिसांनी मनातल्या मनात म्हटलं तरी काय हरकत नाही, पत्रकारांनीसुध्दा. शिवसैनिकांची शपथ आहे. मी म्हणेन त्याप्रमाणे आपण म्हणायचंय..

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली संपूर्ण शपथ
“मी माझ्या कुलदैवताला आणि छत्रपती शिवरायांना स्मरून शपथ घेतो की, मी माझ्या शिवसेना या संघटनेशी आजन्म इमान राखीन. पद असो वा नसो, मी एक – एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून शिवसेनेशी कधीही गद्दारी वा बेइमानी करणार नाही. शिवसेनाप्रमुखांचे आदेश, मी एका कडवट निष्ठेने पाळीन. त्याचबरोबर, येत्या निवडणुकीत शिवसेनेचे भगवा फडकवण्याचे जे स्वप्न आहे, ते निष्ठेने शपथपूर्वक पूर्ण करीन.”