शेतकऱ्यांसाठी शिवसेना बुधवारी पिकविमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढणार आहे. वांद्रे येथील संकुलात एका कंपनीविरोधात हा प्रतीकात्मक मोर्चा काढला जाणार आहे. शेतकऱ्यांना नाडणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेना भवन या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सगळ्या कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नावं बँकांनी लावली पाहिजेच अशी मागणी केली आहे. काही ठिकाणी कर्जमाफीचं प्रमाणपत्र दिलं गेलं मात्र कर्जमाफी झालीच नाही. हे सगळे प्रकार टाळण्यासाठी ही मागणी आम्ही केली आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. शिवसेना भवन या ठिकाणच्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही रोखठोक भूमिका घेतली आहे.

सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्याच पाहिजेत. झारीतले शुक्राचार्य कुणी असतील तर त्यांचा बंदोबस्त केला जाईल असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांना जर कुणी नाडले तर आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

बुधवारचा मोर्चा हा एका कंपनीवर प्रतीक म्हणून जाईल, इतर कंपन्यांवर आमची शिष्टमंडळं जातील. शिवसेना कायम शेतकऱ्यांसोबत आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांबाबतचे ऋण व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येतो आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. विमा कंपन्यांना सरकारी भाषा समजत नसेल तर शिवसेना आपल्या भाषेत त्यांना समाजावून सांगेल, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी सगळ्या विमा कंपन्यांना दिला आहे.

कर्जबाजारी शेतकऱ्यांची नावं बँकेच्या दारावर लावता त्याचप्रमाणे कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नावंही बँकांच्या दारांवर लावण्यात यावी ही आमची मागणी आहे. १७ जुलै रोजी पिकविमा कंपन्यांविरोधात आम्ही मोर्चा काढतो आहोत. हा इशारा मोर्चा असणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.