मुंबईमधील फोर्टिस रुग्णालयात सात दिवसांचं नवजात बाळ आरजू अन्सारी आयुष्याशी झुंज देत आहे. सात दिवसांच्या या बाळाच्या ह्रदयात तीन ब्लॉक आणि एक छिद्र आहे. जिवंत राहण्यासाठी बाळाची लवकरात लवकर हार्ट सर्जरी करण्याची गरज आहे. छोटं मोठं काम करुन पोट भरणाऱ्या वडील अब्दुल अन्सारी यांना जेव्हा हे कळालं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवा आमदार आदित्य ठाकरे यांना जेव्हा या बाळाबद्दल कळालं तेव्हा त्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आणि अब्दुल अन्सारी यांच्याकडे तात्काळ एक लाख रुपयांची मदत सुपूर्द केली.

अब्दुल अन्सारी घणसोलीत वास्तव्यास आहेत. ऐरोलीच्या मनपा रुग्णालयात बाळाचा जन्म झाला होता. बाळ जन्माला आल्यानंतरच डॉक्टरांनी त्याच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं. नंतर त्यांना नेरुळच्या मंगल प्रभू रुग्णालयात पाठवण्यात आलं. आर्थिक संकट असतानाही अब्दुल अन्सारी यांनी मात्र धीर कमी होऊ दिला नाही आणि आपल्या बाळावर उपचार कऱण्याचा निर्णय घेतला.

पण सरकारी रुग्णालयात निराशा झाल्यानंतर अब्दुल अन्सारी बाळाला घेऊन फोर्टिस रुग्णालयात पोहोचले. पण इथे त्यांना अडीच लाखांचा खर्च येईल असं सांगण्यात आलं. अनेक प्रयत्न करुनही पैसे जमत नसल्याचं पाहून अब्दुल अन्सारी यांनी आपल्या ओळखीच्या लोकांकडे मदत मागण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या ओळखीच्या काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवली आणि मदतीचं आवाहन केलं.

युवासेनेच्या काही कार्यकर्त्यांना ही गोष्ट समजताच त्यांनी ही माहिती आदित्य ठाकरेंपर्यंत पोहोचवली. यानंतर आदित्य ठाकरे यांनी लगेचच बाळाच्या उपचारासाठी आर्थिक मदत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. आदित्य ठाकरे यांनी राहुल कनल आणि हुसैन शाह या कार्यकर्त्याच्या माध्यमातून अब्दुल अन्सारी यांच्याकडे एक लाखाची मदत सुपूर्द केली आहे. यासोबत पुढे येणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याचं आश्वासनही दिलं आहे. सोशल मीडियावर मोहीम आणि आदित्य ठाकरेंनी केलेल्या मदतीमुळे बाळावर सध्या उपचार सुरु आहेत. अब्दुल अन्सारी यांनी आदित्य ठाकरे यांचे मनापासून आभार मानले आहेत.

वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन
आदित्य ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी देशात आणि राज्यात असलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. तसंच शिवसैनिकांनी असतील त्या ठिकाणाहूनच शुभेच्छा देण्याची विनंती त्यांनी केली आहे. माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे एक सत्कार्य होईल आणि याचा मला निश्चितच आनंद होईल.

माझी तमाम शिवसैनिक, मिंत्रमंडळी आणि सर्वांना विनंती आहे की होर्डिंग्ज, हार तुरे, केक हा सर्व खर्च टाळून तुम्ही करोनाच्या संकटात अडकलेल्या लोकांवर खर्च करा अथवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्या, माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे एक सत्कार्य होईल आणि याचा मला निश्चितच आनंद होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.