मेट्रो कारशेड दुसऱ्या ठिकाणी हलवणं व्यवहार्य नसून आरे कॉलनीमध्येच कारशेडचं काम सुरु ठेवलं जावं अशी शिफारस करण्यात आली आहे. मेट्रो कारशेड समितीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही शिफारस करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनीच ही समिती गठीत केली होती. समितीला कारशेडसाठी पर्यायी जागा सापडलेली नाही. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या अहवालावर प्रतिक्रिया देताना अहवाल बंधनकारक नसल्याचं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेट्रो 3 प्रकल्पाच्या २५ व्या भुयारीकरणाचा टप्पा आज वरळीत पूर्ण झाला. आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते. आरे कारशेडच्या अहवालासंबंधी बोलताना त्यांनी सांगितलं की, “अहवाल अजूनही पूर्ण आलेला नाही. तो बंधनकारक नाही. अहवालावर अभ्यास करुनच पुढील निर्णय घेतला जाईल. अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. उद्धव ठाकरेंचे निर्णय तुम्ही पाहिले असतील तर कुठेही पर्यावरणाची हानी न करता विकास करायचा आहे. याच्यावर विचार करुनच निर्णय घेतला जाईल”.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने तात्काळ स्थगिती उचलली पाहिजे अशी मागणी केली आहे. “कारशेड आरेमध्येच झालं पाहिजे अशी शिफारस असेल तर सरकारने तात्काळ स्थगिती उचलली पाहिजे. प्रत्येक दिवशी होणारा उशीर पाच कोटी रुपयांचं नुकसान करत आहे. त्यामुळे अधिक नुकसान होऊ न देता सरकारने तात्काळ अहवाल स्विकारुन स्थगिती उचलून वेगाने कामाला सुरुवात केली पाहिजे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

अहवाल काय सांगतो –
अतिरिक्त मुख्य सचिव (अर्थ) मनोज सौनिक यांनी मुख्यमंत्री कार्यालयात समितीचा अहवाल सोपवला आहे. मेट्रोचं कारशेड दुसरीकडे हलवणं व्यवहार्य नसल्याचं यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं आहे. आरे वगळता इतर ठिकाणी कारशेड हलवल्यास खर्च वाढेल. यामुळे सरकारी तिजोरीवर हजारो कोटींचा भार पडेल असंही समितीने सांगितलं आहे. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी तसंच प्रकल्पाला उशीर होऊ नये यासाठी कारशेड आरेमध्येच उभारणं योग्य ठरेल असं समितीने म्हटलं आहे.

सत्तेत येताच उद्धव ठाकरेंकडून स्थगिती –
मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये रात्रीत झाडांची कत्तल करण्यात आली होती. यानंतर पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. मोठ्या प्रमाणात निदर्शनंही करण्यात आली. विरोध करणाऱ्यांमध्ये शिवसेनेचाही समावेश होता. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वात आधी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena aditya thackeray metro 3 aarey carshed devendra fadanvis sgy
First published on: 29-01-2020 at 14:24 IST