मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणदहनाच्या कार्यक्रमावरुन शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या  यांच्याहस्ते रावणदहनाचा कार्यक्रम होणार होता.

मुलुंडमध्ये दस-यानिमित्त रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा रावण जाळण्यात येणार होता. भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्याहस्ते रावणदहन केले जाणार होते. मात्र या कार्यक्रमाची कुणकुण शिवसैनिकांना लागली. शिवसैनिकांनी कार्यक्रमस्थळी धाव घेत विरोध दर्शवला. या कार्यक्रमादरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीदेखील झाली. खासदार किरीट सोमय्या यांनी मात्र या घटनेचा निषेध केला आहे. आम्ही शिवसेनेच्या गुंडगिरीला घाबरणार नाही असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा सुरु होण्यास काही वेळ उरला असतानाच मुलुंडमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये हाणामारी झाली आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरुन भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमधील संघर्ष आणखी तीव्र होत जाईल असे दिसते.  आता शिवाजी पार्कवरुन उद्धव ठाकरे या घटनेवर भाष्य करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.