महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना एकत्र यावेत, उद्धव व राज या दोन्ही ठाकरे बंधुंनी खांद्याला खांदा लावून बाळासाहेबांची शिवसेना वाढवावी ही बहुसंख्य सैनिकांची अपेक्षा लवकरच पूर्ण होणार आहे. अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ च्या निवडणुका मनसे व शिवसेना एकत्र लढणार आहेत. मनसे हा पक्ष विसर्जित करून शिवसेनेत विलिन केला जाईल का पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून युतीचा मार्ग स्वीकारला जाईल याबाबत संदिग्धता आहे. किंबहुना याच मुद्यावरून अधिकृत घोषणा करण्यास विलंब होत आहे.

गेल्याच निवडणुकांच्या वेळी राज ठाकरे यांनी अनेकवेळा टाळीसाठी हात पुढे केला होता, मात्र उद्धव यांनी शेवटपर्यंत टाळी दिली नाही. स्वबळावर महाराष्ट्रात भगवा फडकावण्याचे उद्धव यांचे स्वप्न होते. मात्र, भाजपाने प्रचाराची राळ उडवत पहिल्या क्रमांकाचा पक्ष असं स्थान मिळवलं आणि शिवसेनेचा अपेक्षाभंग झाला. राष्ट्रवादीनं हाच मोका साधत भाजपाला पाठिंबा देऊ केला. विरोधात बसण्यापेक्षा सत्तेत गेलेलं बरं असं म्हणत शिवसेनाही नंतर सरकारमध्ये सामील झाली आणि आत राहून भाजपाला विरोध करत राहिली.

दीर्घ काळाचा विचार करता भाजपा हाच शत्रू नंबर एक असल्याचे उद्धव ठाकरे यांच्याही लक्षात आले असून आपल्याच हाडामांसाच्या मनसेलाच जवळ केलेलं जास्त योग्य असेल असं त्यांना पटवण्यात मनसेबाबत सॉफ्टकॉर्नर असलेल्या धुरीणांना यश आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. राज ठाकरे यांनी गेल्या काही भाषणांमध्ये भाजपाला व पंतप्रधान नरेंद्र मोदींना घणाघाती टीका करून अंगावर घेतलेलं आहे, आणि लोकांनीही त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

राज ठाकरेंचं वक्तृत्व, बाळासाहेबांची पुण्याई व उद्धव ठाकरेंचं नियोजन एकत्र आलं तर भाजपाला समर्थपणे भिडता येईल आणि मतांची विभागणी टाळून जास्त जागा जिंकता येतील हे दोन्ही पक्षांमधील ज्येष्ठांनी मान्य केल्याचं आणि त्यासाठी एकत्र येण्याचं स्वीकारल्याचं सूत्रांनी सांगितलं. शिवसेनेनं स्वबळावर लढण्याची घोषणा करून भाजपाच्या विरोधात लढण्याचे स्पष्ट केले आहेच. त्याच रणनितीचा भाग म्हणून शिवसेना मनसे युती असे धक्कातंत्र अवलंबण्यात येत असल्याची माहिती आहे. शिवसेना व मनसे एकत्र आले तर बाळासाहेबांना मानणाऱ्या सामाईक सैनिकांमध्ये नवचैतन्य सळसळेल ज्याचा निवडणुकांमध्ये फायदा होईल असा दोन्ही पक्षातील समविचारींचा होरा आहे.

(हे वृत्त एप्रिल फूल असून भविष्यात खरोखर असं काही घडलं तर तो योगायोग समजावा)