सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाच्या तपासावरुन सध्या आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्याने बिहार पोलीस सध्या मुंबईत असून तपास करत आहेत. दुसरीकडे सुशांत सिंह मृत्यू प्रकऱणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे. शिवसेनेने त्यांच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना नितीश कुमार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत अशी टीका केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ही टीका केली.

“नितीश कुमार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत. नितीश कुमार यांनी त्यांच्या राज्यात जे सुरु आहे त्यावर भाष्य करावं. या प्रकरणाला राजकीय वळण लागलं असून सगळेजण त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही मुंबई पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी ते पोलिसाकडे द्यावेत. पण फक्त युवा नेत्याचं, मुख्यमंत्र्यांच नाव खराब करण्यासाठी रचलेलं हे षडयंत्र आहे,” असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

असुरक्षित वाटत असेल तर अमृता फडणवीस यांनी राज्य सोडून जावे
असुरक्षित वाटत असेल तर अमृता फडणवीस यांनी राज्य सोडून जावे असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावर बोलताना अमृता फडणवीस यांनी तपास ज्याप्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही असं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अनिल परब यांनी टीका केली.

“गेले पाच वर्ष फडणवीस सरकार होतं. पोलीसदेखील तेच होते. सरकार बदललं म्हणजे पोलीस बदलत नाहीत. गेली पाच वर्ष ज्या पोलिसांच्या सुरक्षेत त्या होत्या आणि आहेत त्यांच्यावर अविश्वास असेल तर त्यांनी खुशाल राज्य सोडून द्यावं,” असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

“गेली पाच वर्ष त्यांनी पोलिसांची सुरक्षा घेतली. ज्या पाच वर्षात फडणवीस सरकारने पोलिसांना सतत शाबासकी दिली. त्यांच्या मागे ठामपणे उभी राहिले. फक्त खूर्ची गेली म्हणून असुरक्षित वाटत असेल तर त्यांच्याकडे राज्य सोडणं हा एकच पर्याय असू शकतो. मुंबईच्या कोणत्याही नागरिकाने आम्ही असुरक्षित असल्याचं म्हटलेलं नाही. अमृता फडणवीस यांना असुरक्षित वाटण्यासारखं असं काय घडलं आहे?,” अशी विचारणा अनिल परब यांनी केली आहे.

“हे राजकारण असून खूर्ची गेल्याची तडफड यामधून दिसत आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. मुंबई पोलीस सक्षम असून ते केस हाताळतील,” असंही ते म्हणाले आहेत. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यासंबंधी होणाऱ्या मागणीवर बोलताना अनिल परब यांनी “मुंबई पोलीस सक्षम आहेत ते तपास योग्यरित्या हाताळतील. कोणीही मागणी केली म्हणून सीबीआयकडे तपास सोपवू शकत नाही. त्यासाठी कारणं द्यावी लागतात,” असं म्हटलं. “गेल्या पाच वर्षात झालेल्या किती हत्या, आत्महत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. याचा लेखाजोखो समोर येऊ द्या. यामागे फक्त राजकारण आहे,” अशी टीका त्यांनी केली.