मुंबईचा विकास आराखडा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे शिवसेनेकडून स्वागत करण्यात आले आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून या निर्णयाचे स्वागत केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत मुंबईचा विकास आराखडा रद्द करण्यात आल्याचे सांगितले. त्याचबरोबर पुढील चार महिन्यांत नवा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या आणि मुंबई महापालिकेची सत्ता ताब्यात असलेल्या शिवसेनेने या निर्णयाचे स्वागत केले.

ट्विटच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, जर या विकास आराखड्यामुळे सर्वसामान्य माणसाचा फायदा होणार नसेल, तर तो रद्दच केला पाहिजे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच घेतली होती. मुंबई महापालिकेकडून नवा आराखडा तयार करताना त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जावा, यासंदर्भात एक सविस्तर पत्र मंगळवारीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. सर्वसामान्य मुंबईकर, जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी यांच्या सूचनाचा विकास आराखडा तयार करताना विचार केला गेला पाहिजे, अशीही अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.