मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना-भाजपा युती संदर्भात मोठे विधान केले आहे. भाजपा-शिवसेना युती होणारच, मित्र पक्षांमध्ये आपसात कुरबुरी होत असतात असे अमित शहा यांनी म्हटले आहे. २०१९ च नाही तर २०२४ ची निवडणूकही शिवसेनेसोबत लढवू. उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन त्यांची नाराजी दूर करु असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.

देशात आणीबाणी लागू करणाऱ्या काँग्रेसने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिकवू नये, देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित आहे असे त्यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शहा बोलत होते. जातीय तेढ वाढवण्यासाठी काँग्रेस कारणीभूत असून काँग्रेसने जातीय तेढ वाढवण्यासाठी एजन्सी नेमली आहे असा आरोप अमित शहा यांनी केला आहे.

विरोधकांजी एकजूट राज्यापुरता मर्यादीत असून मोदींना गरीबी हटवायची आहे तर विरोधकांना मोदींना हटवायचे आहे असे ते म्हणाले. जनतेमध्ये भाजपा सरकारविरोधात भावना असल्याचा दावा त्यांनी खोडून काढला. नरेंद्र मोदींनी जगभरात भारताचा गौरव वाढवला असून मोदी दिवसातले १८ तास काम करतात असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार लोकाभिमुख कारभार करत असून जनता त्यांच्या बाजूने उभी राहिल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. मोदी सरकारने भ्रष्टाचाराविरोधात ठोस पावले उचलली व आमचे सरकार असताना अर्थव्यवस्था बळकट झाली असा दावा त्यांनी केला. २०१९ मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्कीच लोकसभेची निवडणूक जिंकू असा विश्वास शहा व्यक्त केला.