शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री या प्रस्तावानुसार मुख्यमंत्री पद मिळावे असा दावा शिवसेनेने केला आहे. तर असे काहीच ठरले नव्हते, पुढील पाच वर्षे मीच मुख्यमंत्री होणार असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू असताना, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळेल असं वाटत नसल्याचे म्हणत रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे.

शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता नाही. भाजपाचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री असं पहायला मिळू शकते, असंही आठवले म्हणाले आहेत. दोन दिवसांत उद्धव ठाकरे युती आणि सत्तास्थापनेचा निर्णय घेतील. गरज लागल्यास निरोप घेऊन मातोश्रीवर जाण्याची तयारी असल्याचेही रामदास आठवले सांगितले.

महायुतीला जनतनेने निवडलं आहे, त्या जनमताचा आदर दोन्ही पक्षांनी करावा आणि शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे अशी अपेक्षा रामदास आठवलेंनी व्यक्त केली आहे. आपण याबाबत भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहोत असंही आठवलेंनी म्हटलं आहे. सत्तास्थापनेचं काय करायचं याचा निर्णय येत्या चार ते पाच दिवसात होईल असंही रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं. निवडणूक निकालात भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. या दोन्ही पक्षांची युती आहेच त्यामुळे महायुतीचं सरकार येणार हे उघड आहे. मात्र मुख्यमंत्री कोण होणार हा पेच अद्याप सुटलेला नाही. कारण शिवसेनेने मुख्यमंत्रीपद अडीच वर्षांसाठी हवं अशी मागणी केली आहे.