पालिका, अनुदानित शाळा तसेच सभागृहातही सक्ती करण्याची मागणी
मुंबई : मुंबईतील पालिकेच्या, तसेच अनुदानित शाळांमध्ये आठवड्यातून दोन वेळा ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हणणे बंधनकारक करावे, तसेच पालिका सभागृहाप्रमाणेच वैधानिक आणि विशेष समित्यांमध्येही ‘वंदे मातरम्’ गीत सांघिकरीत्या म्हणावे अशी मागणी भाजपकडून सातत्याने पालिका सभागृहात करण्यात येत आहे. मात्र काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचा विरोध लक्षात घेऊन शिवसेनेने या मागणीच्या ठरावाची सूचना बासनात बांधण्याची तयारी केली आहे. त्यावरून भाजप आक्रमक भूमिका घेण्याची चिन्हे आहेत.
मुंबई महापालिका सभागृहाची बैठक सुरू होताना नित्यनेमाने ‘वंदे मातरम्’ गीत म्हटले जाते. पुढच्या पिढ्यांना या गीताचे स्मरण राहावे, या उद्देशाने मुंबईतील पालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळा, तसेच अनुदानित शाळांमध्ये आठवड्यातून दोन वेळा ‘वंदे मातरम्’ गीताचे समूहगान बंधनकारक करावे. त्याचबरोबर सभागृहाप्रमाणे पालिकेतील वैधानिक आणि विशेष समित्यांची बैठक सुरू होताना ‘वंदे मातरम्’ गीत म्हटले जावे, अशी मागणी करणारी ठरावाची सूचना भाजप नगरसेवक संदीप पटेल यांनी पालिका सभागृहात ७ जानेवारी २०२० रोजी सादर केली होती. त्यावेळी ही ठरावाची सूचना महापौरांनी तहकूब केली. त्यानंतर पालिका सभागृहाच्या सप्टेंबर २०२० च्या कार्यक्रमपत्रिकेवर ही ठरावाची सूचना नियमानुसार पुन्हा समाविष्ट करण्यात आली. सभागृहाची मंजुरी मिळत नसल्याने पटेल यांनी २६ ऑक्टोबर २०२०, २२ डिसेंबर २०२० आणि ५ जानेवारी २०२१ रोजी सभागृहाच्या बैठकीत या ठरावाच्या सूचनेला अग्रक्रम मागितला होता, परंतु महापौरांनी अग्रक्रम दिला नाही, असा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. ही ठरावाची सूचना तहकूब करणे, तसेच नगरसेवकाने तीन वेळा मागणी करूनही अग्रक्रम न देणे हे अन्यायकारक आहे. पालिका सभागृहाची बैठक १८ जानेवारी २०२१ रोजी होत असून पटेल यांनी पुन्हा एकदा अग्रक्रमाची मागणी केली आहे. यावेळी तरी महापौर किशोरी पेडणेकर यांनी अग्रक्रमाची मागणी मान्य करावी आणि या विषयावर सभागृहात चर्चेला परवानगी द्यावी. चर्चेअंती सभागृहाच्या संमतीने या संदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी शिंदे यांनी महापौरांना पत्र पाठवून केली आहे.
दरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यात आहे. पालिकेत शिवसेना सत्तेत असली तरीही काही बाबतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सत्ताधाऱ्यांना पडद्यामागून मदत करण्यात येत असते. ‘वंदे मातरम्’च्या समूह गायनाबाबत काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचा आक्षेप लक्षात घेऊन ही ठरावाची सूचना मंजुरीस टाकण्यास महापौरांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. आता येत्या १८ जानेवारी रोजी महापौर कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 15, 2021 12:38 am