पालघर निवडणुकीतील पराभव मी खिलाडू वृत्तीने नाही आणि कोणत्याच परीने मान्य करणार नाही असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. गुरुवारी उद्धव यांची पालघरमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी भाजपावर टीका केली. उन्हामुळे जर यंत्र बंद पडली मग चाचण्या कसल्या घेतल्या?, नाव गायब, बोगस मतदान, यंत्र बिघडली याला लोकशाही म्हणतात? पैसे वाटताना लोक पकडली याला लोकशाही म्हणतात ? असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारले.

पालघर लोकसभेत एका अर्थाने भाजपाचा पराभव झाला आहे. एका आदिवासी मुलाने पंधरा दिवसात अडीच लाख मते मिळवली. आता हातात आठ महिने आहेत. २०१९ ला श्रीनिवास वनगा खासदार झालाच पाहिजे असे उद्धव यांनी म्हटले आहे. काल अमित शहांना भेटलो त्यावेळी शिवसेना जनतेच्या बाजूने असल्याचे त्यांना सांगितले.

शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत. लोकांसोबत बसा आणि बोला, जनसुनावणी खरच असते का? असे उद्धव म्हणाले. त्यांनी पालघर लोकसभेचा संघटक म्हणून श्रीनिवास वनगा यांची नियुक्ती केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला भाजपाविरोधी सूर कायम ठेवला आहे. शिवसेनेने पालघरमध्ये साम-दाम-दंड-भेद वाल्यांना घाम फोडला. आता नाटकं सुरु आहेत, पिक्चर अभी बाकी हैं असे विधान उद्धव यांनी केले आहे.

पालघरमध्ये निवडणूक प्रचारा दम्यान पैसे वाटण्यात आले, त्यांच्यावर अजून कारवाई का झाली नाही ? असा सवाल त्यांनी विचारला आहे.पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना श्रीनिवास वनगा यांनाच उमेदवारी देणार असल्याचे उद्धव यांनी जाहीर केले आहे