शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक दादरमधील महापौर बंगल्यात उभारण्यासाठी मुंबई महापालिकेची मंजुरी मिळाली आहे. सोमवारी मुंबई महापालिकेच्या सभागृहात हा प्रस्ताव मांडण्यात आला होता.  सभागृहाने बहुमताने हा प्रस्ताव मंजुर केला आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईत स्मारक उभारण्यात यावे अशी शिवसैनिकांची मागणी होती. बाळासाहेबांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच जागी बाळासाहेबांचे स्मारक उभारावे, अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे हे स्मारक महापौर बंगल्याच्या जागेत उभारण्याचे निश्चित करण्यात आले. महापौर बंगल्याच्या ११,५५१.०१ चौरस मीटर जागेत बाळासाहेबांचे स्मारक उभारण्यावर शिक्कामोर्तब झाले. पालिका निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी काही दिवस आधी प्रशासनाने महापौर बंगल्याचा भूखंड ‘बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यास’ला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत सादर केला. भाजपचे नगरसेवक आणि सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी तात्काळ हा प्रस्ताव मंजूर करून टाकला. मात्र त्यानंतर तात्काळ आचारसंहिता जारी झाली. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेला पालिका सभागृहात या प्रस्तावाला मंजुरी देता आली नव्हती. आचारसंहिता जारी झाल्यामुळे शिवसेनेला सभागृहाची बैठक आयोजित करता आली नाही आणि त्यामुळे शिवसेनेवर नामुष्की ओढवली होती. विद्यमान पालिका सभागृहाची मुदत ७ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे याच पालिका सभागृहाच्या कार्यकाळात हा प्रस्ताव मंजूर करण्याची घाई शिवसेनेला लागली होती. यानुसार सोमवारी झालेल्या बैठकीत शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर करुन घेतला.

बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्यात करण्यास मनसेचा विरोध आहे. शिवसेनेचा महापौर बंगल्यावर डोळा आहे असा आरोप राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये केला होता. त्यामुळे आगामी काळात मनसेकडून या निर्णयाला तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.