दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आले. एक रूपया नाममात्र भाडेतत्त्वावर ही जागा उपलब्ध करून देण्याची सुधारणा विधेयकात करण्यात यावी, या विरोधकांच्या मागणीसह हे विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आले.

मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात यावे, यासाठी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी ‘मुंबई महापालिका सुधारणा विधेयक २०१७’ विधान परिषदेत मांडले. काँग्रेसचे सदस्य शरद रणपिसे यांनी त्याऐवजी एक रूपया नाममात्र भाडेतत्वाने ही जागा देण्यात यावी, अशी सुधारणा विधेयकात करण्यात यावी, अशी मागणी केली. सुनील तटकरे यांनीही ही मागणी लावून धरली होती. सुरूवातीला जसेच्या तसे विधेयक मंजूर करा, असे शिवसेनेच्या सदस्यांचे मत होते; मात्र त्यानंतर त्यांनीही तयारी दाखवल्यानंतर सुधारणेसह हे विधेयक सभागृहाने एकमताने मंजूर केले.