चलनातून बाद झालेल्या ५०० व हजार रूपयांच्या नोटा जिल्हा मध्यवर्ती बँकांना स्वीकारण्यास निर्बंध घालण्याचा अर्थमंत्री अरूण जेटली यांचा निर्णय दुर्दैवी असल्याचे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. यंत्रणेवर विश्वासच नसेल संपूर्ण व्यवस्थाच मोडीत काढा असा टोलाही त्यांनी जेटली यांना लगावला. शेतकऱ्यांना ज्याची आवश्यकता आहे ते कोण देणार असा सवालही त्यांनी विचारला आहे. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी जिल्हा मध्यवर्ती बँका व सहकारी बँकांना जुन्या ५०० व हजार रूपयांच्या नोटा स्वीकारण्यास परवानगी देणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली.

ठाकरे यांनी जेटली यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. शेतकऱ्यांनी आपला पैसा जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवलेला आहे. सध्या शेतकऱ्यांना ज्याची आवश्यकता आहे. मग त्यांना ते कोण देणार असा सवाल करत या शेतकऱ्यांना त्वरीत पर्याय देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास आणि चलनबदल करण्यास सहकारी बँकांना कदापि परवानगी देणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी स्पष्ट केले. गुरूवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली होती. यावेळी जेटली यांनी सहकारी बँकावर घातलेली बंदी उठविण्यास नकार दिला. अशी परवानगी दिली गेल्यास सहकारी बँका काळा पैसा पांढरा करण्याचे केंद्र बनतील, असेही म्हटले होते.

शहरांत आणि अन्यत्रही बँकांसमोर रात्रंदिवस रांगा लागत असताना, राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांवरील ताण अतोनात वाढलेला असताना, आहेत ते सर्व बँक कर्मचारी कामाला जुंपले तरीही काम करणाऱ्या हातांची कमतरताच भासत असताना सहकारी बँकिंग क्षेत्राला सरकारने नोटा बदलण्याच्या वा तत्सम कामात सहभागी करून न घेतल्याबद्दल अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. खेडय़ापाडय़ांमध्ये राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा जिल्हा बँकांच्या शाखा सर्वाधिक आहेत. खेडय़ातील शेतकरी, ग्रामस्थ, सेवा सोसायटय़ा, दूध उत्पादक संघ, भाजीपाला, किराणा विक्रेते यांचे दैनंदिन व्यवहार जिल्हा बँकांच्या माध्यमातून होतात.