लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते, हे दिल्लीतील निकालांनी दाखवून दिल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेतृत्त्वावर तोफ डागली. मंगळवारी जाहीर झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (आप) विजयाचे कौतुक करताना मित्रपक्ष असलेल्या भाजपला काही सणसणीत टोले लगावले. आपचा विजय हा लोकशाहीचा विजय असून, या विजयाचे अनेक अर्थ आहेत. दिल्लीतील जनतेने कोणाचाही दबाव किंवा आमिषाला बळी न पडता स्वत:ला पाहिजे तेच केले, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. त्यामुळे दिल्लीश्वरांनी जनतेला गृहीत धरू नये. देशात सध्या मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे. त्यामुळेच दिल्ली विधानसभेचा निकाल हा लोकसभा निवडणुकीच्या अगदी उलट लागल्याचे उद्धव यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्यापरीने या निकालाचा अर्थ लावावा, असे सूचक विधानही उद्धव यांनी केले. दिल्लीतील भाजपचा पराभव हा बेदी यांचा नसून मोदी यांचा असल्याच्या अण्णा हजारेंच्या विधानाशी आपण सहमत असल्याचा जाहीर उच्चारही उद्धव यांनी या पत्रकार परिषदेत केला. याशिवाय, निमंत्रण आल्यास केजरीवाल यांच्या शपथविधीला जरूर उपस्थित राहू, असेही त्यांनी म्हटले.