News Flash

७० लाख रोजगार निर्माण झाले मग बेरोजगारांच्या झुंडी महाराष्ट्रावर का आदळत आहेत? – उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच आमने-सामनेची थेट मुलाखत टाळत ई–मेलद्वारे मुलाखत दिली. त्याच मुद्यावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर उपरोधिक टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच आमने-सामनेची थेट मुलाखत टाळत ई–मेलद्वारे मुलाखत दिली. त्याच मुद्यावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उपरोधिक टीका केली आहे. निवडणुकीआधी मोदी हे पत्रकारांचे मित्र होते. मात्र पंतप्रधान झाल्यावर त्यांनी स्वतःभोवती पिंजरा उभा केला. मोदी यांनी पंतप्रधान म्हणून अनेक पायंडे पाडले. ते नक्कीच ग्रेट आहेत. ई–मेलद्वारा ‘फक्कड’ मुलाखतींचा पायंडा पाडून मोदी यांनी नव्या पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली आहे. हे असेच सुरू राहिले तर अनेक पत्रकारांना रोजगार गमावण्याची वेळ येईल व त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे ओझे पंतप्रधानांच्या शिरावर पडेल असे लेखामध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी ई–मेलद्वारे जी मुलाखत दिली त्यास ‘प्रचार’ किंवा ‘प्रोपोगंडा’ म्हटले जाते. हे सर्व चीन, रशिया वगैरे कम्युनिस्ट राजवटीत घडत असे. एकतर्फी संवादाचाच हा प्रकार आहे. थेट आमने-सामने मुलाखत झाली असती तर मुलाखतकारास उलटतपासणी करता आली असती. तेवढे ‘स्वातंत्र्य’ पत्रकारांना हवेच. अर्थात सध्याच्या पंतप्रधानांनी ही पद्धत संपवून फक्त त्यांना जी योग्य वाटतील तीच उत्तरे दिली आहेत असे लेखात म्हटले आहे.

पंतप्रधान यांनी स्वतः सांगितल्यानुसार चार महिन्यांत 70 लाख रोजगार निर्माण झाल्याने बेरोजगारांनी ‘पकोडे’ तळण्यासाठी आणलेले बेसन, बटाटे, कांदे, तेल वगैरे वायाच गेले असे म्हणायला हवे. पुन्हा पंतप्रधान म्हणतात त्यानुसार जे साधारण एक कोटी रोजगार निर्माण झाले ते कोणत्या राज्यात आणि अशी रोजगारनिर्मिती झालीच असेल तर मग बिहार, उत्तर प्रदेश, प. बंगाल व आसाममधून बेरोजगारांच्या झुंडीच्या झुंडी महाराष्ट्र, कर्नाटकसारख्या राज्यांवर का आदळत आहेत? असा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात

– निवडणुकीआधी मोदी हे पत्रकारांचे मित्र होते. मात्र पंतप्रधान झाल्यावर त्यांनी स्वतःभोवती पिंजरा उभा केला. मोदी यांनी पंतप्रधान म्हणून अनेक पायंडे पाडले. ते नक्कीच ग्रेट आहेत. ई–मेलद्वारा ‘फक्कड’ मुलाखतींचा पायंडा पाडून मोदी यांनी नव्या पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली आहे. हे असेच सुरू राहिले तर अनेक पत्रकारांना रोजगार गमावण्याची वेळ येईल व त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे ओझे पंतप्रधानांच्या शिरावर पडेल. मोदी यांनी एक कोटी रोजगार निर्माण केलेच आहेत. त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच!

– पंतप्रधान मोदी यांनी अचानक ई-मेलद्वारे मुलाखती दिल्या आहेत. या मुलाखती ‘ई-मेल’द्वारे दिल्या आहेत म्हणजे मुलाखतींचा आमना-सामना झाला नाही. पत्रकारांनी पंतप्रधान कार्यालयास प्रश्न पाठवले व त्यांची उत्तरे लेखी स्वरूपात पाठवली गेली. त्यास अनेकांनी पंतप्रधानांच्या मुलाखतींचे स्वरूप दिले आहे. दुसर्‍या शब्दांत यास ‘प्रचार’ किंवा ‘प्रोपोगंडा’ म्हटले जाते. हे सर्व चीन, रशिया वगैरे कम्युनिस्ट राजवटीत घडत असे. एकतर्फी संवादाचाच हा प्रकार. थेट मुलाखतीत अनेकदा प्रश्नांची सरबत्ती होते. समोरच्याने ‘फेकाफेक’ केली असेल तर त्याची उलटतपासणी मुलाखतकार करीत असतो. तेवढे ‘स्वातंत्र्य’ पत्रकारांना हवेच. अर्थात सध्याच्या पंतप्रधानांनी ही पद्धत संपवून फक्त त्यांना जी योग्य वाटतील तीच उत्तरे दिली आहेत व त्या पद्धतीच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत.

– श्री. मोदी यांनी बेरोजगारीवरून जे मतप्रदर्शन केले आहे ते विरोधकांची तोंडे बंद करणारे आहे. एका वर्षात 70 लाख रोजगार निर्माण केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. सप्टेंबर 2017 ते एप्रिल 2018 या काळात 45 लाख रोजगार निर्माण झाले. हीच माहिती आधार मानली असता रोजगारनिर्मिती केवळ सन 2017 मध्येच 70 लाखांपर्यंत पोहोचते असे पंतप्रधानांनी जाहीर केले. याचा अर्थ 2019 येईपर्यंत त्याच्या दुप्पट-तिप्पट रोजगारनिर्मिती होईल असे पंतप्रधानांना वाटते. जर मुलाखत प्रत्यक्ष झाली असती तर बेरोजगारीच्या प्रश्नावर काही उपप्रश्न विचारण्याची संधी त्या पत्रकारास मिळाली असती. ते उपप्रश्न असे की, जर एक-दोन कोटी रोजगार निर्माण झाले असतील हे मान्य झाले तर ते नक्की कोणत्या क्षेत्रात आहेत व ही आकडेवारी ग्राह्य कशी मानावी? हिंदुस्थानात बेरोजगारांची संख्या नक्की किती व इतके रोजगार निर्माण होऊनही ‘नोकर्‍या’ व त्यातील आरक्षणासाठी तरुण मुले रस्त्यावर उतरली आहेत याचे विश्लेषण तुम्ही कसे कराल, असे प्रश्न विचारण्याची संधी मिळू शकली नाही.

– जे बेरोजगार आहेत त्यात इंजिनीअर, डॉक्टर, पदवीधर मोठ्या संख्येने आहेत. या मंडळींना रोजगार मिळत नसतील तर त्यांनी ‘पकोडे’ तळून रोजगार निर्माण करावा अशी भूमिका पंतप्रधानांनी चारेक महिन्यांपूर्वी मांडली होती आणि त्यावर टीकेचे वादळ उठले होते. आता पंतप्रधान यांनी स्वतः सांगितल्यानुसार चार महिन्यांत 70 लाख रोजगार निर्माण झाल्याने बेरोजगारांनी ‘पकोडे’ तळण्यासाठी आणलेले बेसन, बटाटे, कांदे, तेल वगैरे वायाच गेले असे म्हणायला हवे. पुन्हा पंतप्रधान म्हणतात त्यानुसार जे साधारण एक कोटी रोजगार निर्माण झाले ते कोणत्या राज्यात आणि अशी रोजगारनिर्मिती झालीच असेल तर मग बिहार, उत्तर प्रदेश, प. बंगाल व आसाममधून बेरोजगारांच्या झुंडीच्या झुंडी महाराष्ट्र, कर्नाटकसारख्या राज्यांवर का आदळत आहेत? दोन वर्षांपूर्वी ‘नोटाबंदी’सारख्या प्रकारामुळे देशातील संघटित व असंघटित उद्योगांस फटका बसला व नोकर्‍या गमावणार्‍यांची संख्या वाढली.

– हा आकडाही कोटीच्या घरात आहे. मुंबईतील रोजगार हा बिल्डर, बांधकाम उद्योग, सेवा उद्योगात होता. तिथे वाळवंट झाले. संभाजीनगर व चाकणसारख्या औद्योगिक शहरांत पाचशेच्या वर कारखान्यांची मोडतोड कालच्या हिंसाचारात झाली ती सरकारने ‘हात चोळत’ बसण्याची भूमिका घेतल्यामुळे. कालच्या हिंसाचारामुळे किमान 25 हजार लोकांनी रोजगार गमावला व त्यास सरकारी नपुंसकशाही जबाबदार आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे जर आमने-सामने मुलाखत झाली असती तर पंतप्रधानांना देता आली असती. पुन्हा देशातील नागरिकांच्याही मनात काही प्रश्न आहेत. स्वतःस ‘प्रधान सेवक’ समजणार्‍या मोदी यांनी या आणि इतर प्रश्नांना उत्तरे देणे गरजेचे होते. मात्र त्याऐवजी ‘ई-मेल मुलाखती’चा ‘शॉर्टकट’ निवडला गेला. मागील चार वर्षांत पंतप्रधानांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. ‘मन की बात’मधून त्यांनी बोलायचे व पेपरवाल्यांनी छापायचे किंवा दाखवायचे. मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वास हे शोभणारे नाही. निवडणुकीआधी मोदी हे पत्रकारांचे मित्र होते. मात्र पंतप्रधान झाल्यावर त्यांनी स्वतःभोवती पिंजरा उभा केला. मोदी यांनी पंतप्रधान म्हणून अनेक पायंडे पाडले. ते नक्कीच ग्रेट आहेत. ई-मेलद्वारा ‘फक्कड’ मुलाखतींचा पायंडा पाडून मोदी यांनी नव्या पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली आहे. हे असेच सुरू राहिले तर अनेक पत्रकारांवर रोजगार गमावण्याची वेळ येईल व त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे ओझे पंतप्रधानांच्या शिरावर पडेल. मोदी यांनी एक कोटी रोजगार निर्माण केलेच आहेत. त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2018 7:43 am

Web Title: shivsena chief uddhav thackray slams narendra modi over interview
Next Stories
1 शेतकरी कर्जमुक्त होणार असेल तर, भाजपला साथ करण्याचा विचार करू
2 फूट पाडण्याच्या आरोपाचा शरद पवार यांनी खुलासा करावा
3 एसटीच्या बिगर वातानुकूलित स्लीपरचा मार्ग मोकळा
Just Now!
X