आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेऊ, अशी धमकी वारंवार देणाऱ्या शिवसेनेची नितेश राणे यांच्याकडून खिल्ली उडवण्यात आली आहे. ‘आम्ही राज्य सरकारचा पाठिंबा काढू’, हे वाक्य सर्वाधिक बोलण्याचा विक्रम केल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. नितेश राणे एवढ्यावरच थांबले नसून, त्यांनी ‘गिनीज वर्ल्डस रेकॉर्ड’कडे तसे रितसर पत्रही पाठवले आहे. या पत्रात आपण जागतिक विक्रमासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची नोंदणी करू इच्छित असल्याचे नितेश यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे हे भारतातील महाराष्ट्र या राज्यात असलेल्या शिवसेना या प्रादेशिक पक्षाचे प्रमुख आहेत. आम्ही त्यांच्या नावे, शिवसेना राज्य सरकारचा पाठिंबा काढेल, हे वाक्य सर्वात जास्तवेळा उच्चारल्याबद्दल जागतिक विक्रमाची नोंद करू इच्छित आहोत. गिनीज बुकात नोंद होणारा हा पहिलाच अशा प्रकारचा विक्रम असेल. माझ्या या पत्रालाच नोंदणीसाठीचा अर्ज समजण्यात यावे, असे पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

सेनेचा इतिहास..इशाऱ्यांचा आणि माघारीचा!

नितेश राणेंच्या या पत्रामुळे आता शिवसेना विरुद्ध राणे यांच्यातील वाद नव्याने पेटण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते नारायण राणे आणि त्यांचे सुपूत्र नितेश राणे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छूक असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, नितेश यांनी हे वृत्त फेटाळून लावले होते. मी सेनेत जाणार की नाही याची माहिती वांद्र्याच्या साहेबांना किंवा त्यांच्या पीएंना त्यांनी का विचारली नाही, असा प्रतिसवाल उपस्थित केला. तसेच कोण कोणाचा पाठलाग करत होते. नाहीतर एक दिवस आम्हालाच वस्त्रहरण करावे लागेल, असे त्यांनी म्हटले होते. तर दुसरीकडे वारंवार सरकारचा पाठिंबा काढण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक इशारा दिला आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असताना काही जण सरकार पाडण्याची, पाठिंबा काढण्याची भाषा करत होते. पण आम्ही मध्यावधी निवडणुकांसाठी तयार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिली.

शिवसेनेच्या धमक्यांना भाजप घाबरत नाही!

गेल्या काही दिवसांपासून राणे कुटुंबिय काँग्रेसवर नाराज असल्याचे वृत्त सातत्याने माध्यमांत येत आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. नारायण राणे यांनीही आपली भूमिका स्पष्ट न करत सातत्याने काँग्रेस नेतृत्त्वावरच टीका केली आहे. माजी खासदार नीलेश राणे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यावेळीही त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. नितेश राणेही सातत्याने काँग्रेस नेतृत्वावर टीका करताना दिसतात. त्यामुळे राणे कुटुंबीय काँग्रेसचा लवकरच त्याग करणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा असते.