वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने गुरुवारी मित्रपक्ष भाजपला खिंडीत गाठले. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी वेगळ्या विदर्भाचे आश्वासन आम्ही दिले नव्हते, असे मंगळवारी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले. हाच मुद्दा उचलून शिवसेनेने भाजपला चिमटे काढले आहेत. ‘स्वतंत्र विदर्भा’ची गाजरी पुंगी वाजवणार्‍यांचे कान आता सोनारानेच टोचले आहेत, असा टोला शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तील अग्रलेखामधून लगावण्यात आला आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, ‘वेगळे विदर्भ राज्य करण्याचे आश्‍वासन आम्ही कधीच दिले नव्हते, अशी ठाम भूमिका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतली आहे. त्यामुळे पाच-पंचवीस वेगळे विदर्भवाले गरगरून खाली कोसळले असून त्यांच्या नाकासमोर चप्पल धरण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र तोडण्याबाबत काही मंडळींनी जणू विडाच उचलला होता व हा न रंगणारा विडा चघळीत ते १०५ हुतात्म्यांच्या स्मारकावर पिचकार्‍या मारीत होते. या सगळ्या पिचकारीबाज लोकांवर आता बेरोजगार होण्याची वेळ अमित शहा यांनी आणली आहे.’
अखंड महाराष्ट्राचे अस्तित्व पुसण्यामागे विदर्भातील काही लोकांचा व्यापारी स्वार्थ असल्याची टीका करून वेगळा विदर्भाचे आश्वासन आम्ही दिले नव्हते, असे अमित शहा बोलले म्हणजे त्यांच्या तोंडून प्रत्यक्ष नरेंद्र मोदीच बोलले असे आम्ही मानतो, असेही अग्रलेखात लिहिण्यात आले आहे. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा निकालात काढल्याबद्दल अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे अभिनंदनही करण्यात आले आहे.