भाजपची कोंडी करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सरसावली; दोन महत्त्वाच्या खात्यांवर शिवसेना ठाम 

सरकार स्थापण्यावरून भाजप आणि शिवसेनेत सुरू झालेल्या खडाखडीच्या पार्श्वभूमीवर सेनेला चुचकारण्याची खेळी काँग्रेस-राष्ट्रवादीने सुरू केली आहे. शिवसेनेबरोबर हातमिळवणी करणे काँग्रेसला शक्य नसले तरी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला मदत करून भाजपची कोंडी करण्याचा दोन्ही काँग्रेसचा प्रसत्न आहे. दुसरीकडे गृह, नगरविकास , महसूल आणि वित्त या चारपैकी दोन महत्त्वाची खाती मिळावीत म्हणून शिवसेना अडून बसली आहे.

भाजप आणि शिवसेनेत अद्याप सहमती होऊ शकलेली नाही. ‘जे ठरले तेच हवे’ अशी ठाम भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतली आहे. भाजप आणि शिवसेनेत सत्तावाटपासाठी वाटाघाटी सुरू आहेत. शिवसेनेने गृह, नगरविकास, वित्त आणि महसूल या चारपैकी दोन खात्यांवर दावा केला आहे. यापैकी महसूल आणि वित्त खाती शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी असली तरी भाजपमध्ये महसूल खाते सोडण्यास विरोध आहे. याऐवजी गृहनिर्माण खाते शिवसेनेला द्यावे, असे भाजपमधील काही नेत्यांचे मत आहे. परस्परांवर अविश्वास काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिवसेनेबद्दल खात्री देता येत नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली तरीही शिवसेना अचानक उलटू शकते, असे काँग्रेसमधील नेत्यांचे मत आहे. साडेचार वर्षे टोकाचा विरोध करूनही शेवटी शिवसेनेने भाजपबरोबर हातमिळवणी केली होती याकडे दोन्ही काँग्रेसचे नेते लक्ष वेधत आहेत.  दुसरीकडे शिवसेनेला काँग्रेसच्या पाठिंब्याबाबत खात्री नाही.  तर काँग्रेस ठाम राहिली तरी राष्ट्रवादी काहीही करू शकते, अशीही शिवसेनेला भीती आहे. यातच राममंदिरावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अनुकूल आल्यास शिवसेनेची भूमिका काँग्रेसला मान्य होण्यासारखी नाही.

झाले काय?

युतीतील वाद लक्षात घेऊन काँग्रेसने वेगळीच खेळी केली आहे. शिवसेनेकडून सरकार स्थापण्याचा प्रस्ताव आल्यास विचार करण्यात येईल अशी भूमिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली. या संदर्भात पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. शिवसेना – राष्ट्रवादी – काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापण्यास राष्ट्रवादी अनुकूल आहे.

अध्यक्षांच्या निवडणुकीत ताकद दाखविणार

शिवसेनेला मदत करणे काँग्रेसला शक्य होणार नाही. त्यातच राम मंदिरावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे. शिवसेना आणि काँग्रेसची भूमिका भिन्न आहे. यामुळेच भाजप आणि शिवसेनेचे सख्य झाले नाही वा भाजपने शिवसेनेला डावलून अल्पमतातील सरकार स्थापन केल्यास विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत शिवसेनेला मदत करण्याची काँग्रेस राष्ट्रवादीची खेळी आहे. शिवसेना ५६ , राष्ट्रवादी ५४ व काँग्रेस ४४ एकत्र आल्यास १५४ संख्याबळ होते. याशिवाय शिवसेनेने सात अपक्षांचा पाठिंबा मिळविला आहे.