News Flash

शिवसेना नगरसेविकेचा भगवती रुग्णालयात गोंधळ; डॉक्टरांचा अर्वाच्च भाषेत पाणउतारा

गुन्हा दाखल करण्याची भाजपाची मागणी

कांदिवलीमधील पालिकेच्या भगवती रुग्णालयात एका रुग्णाला भरती करण्यावरून शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका आणि शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी बुधवारी गोंधळ घातला. रुग्णालयातील डॉक्टरांसोबत अर्वाच्च भाषेत वाद घातल्याचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, या प्रकरणी दोशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा आणि शिक्षण समिती अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी शिक्षण समितीवरील भाजपा सदस्यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून केली आहे.

आपल्या एका रुग्णाला योग्य ती वागणूक न दिल्याबद्दल जाब विचारण्यासाठी दोशी भगवती रुग्णालयात गेल्या होत्या. तेथील डॉक्टरांबरोबर त्यांचा वादही झाला. अर्वाच्च भाषेत त्या डॉक्टरांशी बोलत असल्याची व्हिडिओ क्लिप समाजमाध्यमांवर पसरली होती. पालिकेच्या विभाग कार्यालयांतील सहाय्यक आयुक्तांशी संपर्क साधून त्यांना तात्काळ रुग्णालयात यावे असेही दोशी यांनी बजावले. हा गोंधळ बराच वेळ सुरू होता. या प्रकारामुळे रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

करोना काळात दोशी यांनी डॉक्टरांबरोबर अर्वाच्च भाषे वाद घातल्याबद्दल शिक्षण समितीमधील भाजपा सदस्य प्रतीक कर्पे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सद्यास्थितीत मुंबईमधील डॉक्टर सर्वसामान्यांचे जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना दोशींचे हे वर्तन डॉक्टरांचे मनोधैर्य खच्ची करणारे आहे. दोशी या शिक्षण समितीच्या अध्यक्षा आहेत. त्यांचे डॉक्टरांविरोधात अरेरावीची भाषा करणारे वर्तन पदाला साजेसे नाही. दोशी यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीने त्यावेळी रुग्णालयात मुखपट्टीही लावलेली नव्हती, याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झालेला आहे. याप्रकरणाची आयुक्तांनी तातडीने दखल घेऊन दोशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना डॉक्टरांची माफी मागायला लावावी. तसेच त्यांचा शिक्षण समिती अध्यक्षपदाचा राजीनामा त्वरित घ्यावा, अशी मागणीही कर्पे यांनी पत्रात केली आहे.

संध्या दोशी यांचा माफीनामा
“भगवती रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यावरुन डॉक्टरांबरोबर वाद झाला होता. परंतु त्यावेळी डॉक्टर आणि आपल्यात शाब्दीक चकमक उडाली. डॉक्टरांनीही संतापाच्या भरात अपशब्द वापरले. माझेही भान सुटले आणि तोंडून अपशब्द बाहेर पडले. असे व्हायला नको होते. घडलेल्या प्रकाराबद्दल मी क्षमा मागते,” असं सांगत संध्या दोशी यांनी माफी मागितली आहे.

दरम्यान, या प्रकरणी भगवती रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसात तक्रार नोंदविली नसल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 9:39 am

Web Title: shivsena corporator sandhya doshi create ruckus in bhagwati hospital sgy 87
Next Stories
1 रुग्णालयांतील प्राणवायू साठवणूक केंद्रांची सखोल चौकशी करा!
2 शिक्षण समिती अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
3 मुंबईत सात टक्केच नागरिकांचे लसीकरण