News Flash

मोदींवर टीका करणाऱ्यांना अंगावर घेण्याची हिंमत आहे काय? सेनेचा भाजपला सवाल

काही दिवसांपासून भाजप-शिवसेनेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर एकत्र असले तरी दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करण्यातच धन्यता मानताना दिसत आहेत. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ मधील अग्रलेखातून भाजप नेत्यांच्या या भूमिकेवर सडकून टीका करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सातत्याने खिल्ली उडवणाऱ्या समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना अंगावर घेण्याची हिंमत भाजपच्या नेत्यांमध्ये आहे काय असा सवाल केला आहे. ‘‘मला चहा बनवता येतो, चांगले कपडे घालता येतात आणि ड्रमही वाजवता येतो. त्यामुळे मी पंतप्रधान होऊ शकतो,’’ अशा शब्दांत आझम खान यांनी पंतप्रधानांवर टीका केली होती.
खासदार किरीट सोमय्या, आमदार आशिष शेलार आदींसह काही नेते वारंवार शिवसेना व त्यांच्या मुंबई महापालिकेतील कारभारावर वारंवार टीका करताना दिसतात. त्यांना शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात येते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाजप-शिवसेनेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्तेत असले तरी रोज एकमेकांवर टीका करण्यातच या दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा लागलेली दिसते. गुरूवारी भाजप नेते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर टीका करू नये असे आवाहन केले होते. अशा गोष्टींमुळे जनतेत संभ्रम निर्माण होतो. काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते सत्तेवर असतानाही एकमेकांवर टीका करत त्याचाच त्यांना फटका बसल्याचे त्यांनी नमूद केले होते. शुक्रवारी शिवसेनेने सामना दैनिकातून भाजप नेत्यांवर कोरडे ओढले आहेत.
काय म्हटले आहे शिवसेनेने:
* मुंबईतील काही टिनपाट लोक ऊठसूट शिवसेनेवर टीका करीत आहेत. वातानुकूलित चेंबरमध्ये बसून शब्दांचे तोबरे सोडायला अक्कल लागत नाही, पण या टिनपाट लोकांनी आजम खान यांच्यासारख्यांना अंगावर घेण्याची हिंमत दाखवायला हवी.
* पंतप्रधान झालो तर प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात २५-२५ लाख जमा करीन, अशी कोपरखळी आजम खान यांनी मारली. ती भाजप पुढार्‍यांना झोंबणारी आहे. सत्तेवर येताच सर्व काळाबाजारवाल्यांना धडा शिकवू, परदेशी बँकांतील लाखो कोटींचे काळे धन परत आणून जनतेच्या बँक खात्यात १५ लाख जमा करू, असे वचन मोदी यांनी दिले होते व आजम खानसारखे बेरकी त्यावरच प्रश्‍न विचारत आहेत. या प्रश्‍नाचे उत्तर शिवसेनेवर आंधळेपणाने टीका करणार्‍यांकडे नसावे. तसे ते असते तर छातीवरची बटणे तुटेपर्यंत दीर्घ श्‍वास घेऊन त्यांनी आजम खानला दम भरला असता. लखनौ-मुंबईचे भाजपवीर शिवसेनेवर टीका करण्यात जीवनाचे सार्थक मानीत आहेत.
* या देशाचे राष्ट्रपती, राज्यपाल, सरन्यायाधीश अनेकदा मुसलमान झाले व त्यांनी उत्तम काम केले. आजम खान यांनी हे सर्व लक्षात घेतलेले दिसत नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला असे जरी असले तरी आजम खानची जीभ हासडून बाहेर काढण्याची हिंमत भाजप पदाधिकार्‍यांत आहे काय?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 10:46 am

Web Title: shivsena criticize on bjp leaders
Next Stories
1 मुंबई सेंट्रल आगार पुन्हा गजबजणार!
2 परवडणारे घर ६० लाखांचे!
3 पालघरमधील कुपोषण रोखण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग सरसावला!
Just Now!
X