विदर्भातील शेतकऱयांच्या आत्महत्येच्या प्रश्नावरून शिवसेनेने शुक्रवारी भाजपला घरचा आहेर दिला आहे. शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी असतानाही आत्महत्येच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.
फडणवीस दावोसमधील उद्योग परिषदेत जगभरातील गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात यावे, यासाठी प्रयत्न करीत असताना विदर्भातील शेतकऱय़ांनी आत्महत्या करावी, हे भयंकर असल्याची भावना अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील सरकार बदलले असले तरी विदर्भातील शेतकर्‍यांच्या जीवनात फरक पडल्याचे जाणवत नाही. विदर्भाचे सुपुत्र असलेले फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे विदर्भातील शेतकर्‍यांच्या जीवनास नवी उभारी येईल, अशी आशा सगळ्यांनाच होती व आहे, पण गेल्या २४ तासांत विदर्भात पुन्हा शेतकर्‍यांनी तडफडून प्राण सोडला आहे. दुष्काळी परिस्थिती आणि कर्ज फेडू न शकल्याने विदर्भातील आणखी पाच शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे, असेही या अग्रलेखात लिहिण्यात आले आहे.
महाराष्ट्राचा डंका ‘दावोस’मध्ये पिटला जात असताना इकडे विदर्भात आपला शेतकरी विष पिऊन मरत असल्याचे चित्र विदारक आहे, असल्याचेही अग्रलेखात लिहिण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्ही सरकारसोबत असलो, तरी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा शिवसैनिक विरोध करेल, असे म्हटले होते. त्यानंतर शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरून शिवसेनेने भाजप नेतृत्त्वाला धारेवर धरले आहे.