सत्तेत राहूनही सहकारी भाजपला टोले मारण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही असे दिसते आहे. त्याचेच प्रत्यंत्तर सोमवारी पुन्हा एकदा आले. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेने थेट निशाणा साधला. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱयांना अटक करण्यात पोलीस अपयशी ठरल्यानंतर राज्याच्या गृहखात्याची जबाबदारी सांभाळणाऱया फडणवीस यांच्यावर शिवसेनेने टीकास्त्र सोडले.
जे दाभोलकर प्रकरणात झाले तेच पानसरेप्रकरणी घडते आहे. कथा, पटकथा व संवाद बदलले नाहीत. नायक, खलनायक बदलून जुन्याच पटकथेवर नवा सिनेमा सुरू आहे, अशी टीका अग्रलेखात करण्यात आली आहे. पानसरे यांच्या मारेकर्‍यांना पकडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, असे आश्‍वासन फडणवीस यांनी दिले होते. त्यावरून दाभोलकरांची हत्या झाली, तेव्हा कॉंग्रेसचे मुख्यमंत्री व राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांनी नेमके हेच आश्‍वासन दिले होते, याची आठवण करून देत दाभोलकरांचे मारेकरी अजूनही गायब आहेत व पानसरे यांच्या मारेकर्‍यांसंदर्भात फडणवीस यांनी तेच विधान केल्याचे सांगत त्यांच्यावर टीका करण्यात आली. पानसरे यांच्या मारेकर्‍यांसंदर्भात फडणवीस यांनी पोलिसांनी ताकद लावली तर आरोपी पकडण्यात निश्‍चित यश मिळेल, असे वक्तव्य केले होते. त्यावरही शिवसेनेनी टीका केली. ‘मुख्यमंत्र्यांचे हे विधान गंमतीचे आहे व पोलिसांवर खापर फोडणारे आहे. ज्या पोलिसांवर ते अविश्‍वास दाखवीत आहेत ते गृहखाते स्वत: मुख्यमंत्री सांभाळीत आहेत. पोलिसांनी जोर लावावा म्हणजे नेमके काय करावे? याबाबत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले नाही.’ असे अग्रलेखात लिहिण्यात आले आहे.